महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर १० डिसेंबर रोजी गडचिरोलीत येणार.
“महिला आयोग आपल्या दारी” जनसुनावणी मध्ये अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या: रुपाली चाकणकर यांचे आवाहन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
गडचिरोली, दि.०८ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार दि. १०/१२/२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे दुपारी १२.०० वाजता होणार असून आयोगाच्या मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपल्या अडचणी मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोगाद्वारे करत आहे.
गडचिरोली जिल्हयात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.