नवीन वर्षाची पार्टी करताय? तर खालील निर्बंध पाळा, नाहीतर होईल पोलिसांची कारवाई.

54
rules-and-regulations-for-new-year-celebration-in-maharashtra
नवीन वर्षाची पार्टी करताय? तर खालील निर्बंध पाळा, नाहीतर होईल पोलिसांची कारवाई.

सिद्धांत
३० डिसेंबर २०२१: उद्या २०२१ वर्षाचा शेवटचा दिवस असून तो साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी राज्यभरातील जनता पार्ट्यांचे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांकाचे आयोजन करत आहे. पण अश्यावेळी वाढत चाललेल्या ओमिक्रोनच्या धोक्याचे जनतेने भान राखावे असे आवाहन महाराष्ट्र प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या दिवशी गर्दी होऊन कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनाने काही निबंध लागू केले असून जनतेने त्याचे पालन करावे असे जाहीर केले आहे.

नवीन वर्षांच्या कार्यक्रमांसाठी काय आहेत निर्बंध?

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल. एकूण क्षमतेच्या फक्त २५ टक्के आसनव्यवस्थेला परवानगी.
इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.
या शिवाय जिल्हा आपत्ती प्राधिकरणास स्थानिक पातळीवर परिस्थितीचा अंदाज घेवून योग्य ते निर्बंध लागू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच जेष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या दरम्यान मास्क लावणे, सॅनिटायझर्सचा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर लसीकरण न केलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहेत.

निर्बंध मोडल्यास पोलिसांकडून होणार कठोर कारवाई.
मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. हॉटेल्स, हॉल्स किंवा इतर कार्यक्रमाच्या स्थळी कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन न केल्यास आयोजकांवर ५०,००० रुपयांचा दंड तसेच प्रॉपर्टी काही काळासाठी सील करण्यात येईल.

नवीन वर्षासोबत महाराष्ट्रात ओमिक्रोनही येतोय.
महाराष्ट्रात ओमिक्रोनग्रस्त रुग्णांची संख्या २५२ वर पोहचली असून, देशभरात ९६१ ओमिक्रोनग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १४,००० च्या पार गेली असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेचा अंदाज वर्तविला जात आहे.