सिद्धांत
३० डिसेंबर २०२१: केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार जाहीर झाले.. यात मराठीत युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला युवा लेखक पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्यामध्ये किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ व तसेच त्यांना जुगाड या कादंबरीला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स’, ‘96 मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.
ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. सुधीर रसाळ यांच्या मर्ढेकरांची कविता : जीवनाचे अंतस्वरुप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय हरीश्चंद्र थोरात यांच्या मूल्यभानाची सामग्री या समीक्षाग्रंथाला, बालाजी सुतार यांच्या ‘दोन शेतकऱ्यांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या लघुकथेची साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रमेश वानखेडे यांच्या सायबर संस्कृती या निबंधाला तर प्रसिद्ध कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या बाऊल या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जी. के. ऐनापुरे यांच्या चिंचपोकळी यांच्या कथासंग्रहाला, ज्येष्ठ लेखक व माजी खासदार जनार्दन वाघमारे यांच्या ‘यमुनेचे पाणी’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.1 लाख रुपये रोख व ताम्रपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेसाठी तर ख्यातनाम लेखिका डॉ मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता साहित्य अकादमीचे मानाचे अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी तामीळ भाषेतून मराठीत अनुवादीत केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले.डॉ. कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत तसेच त्यांनी नाट्यप्रयोगही केले आहेत.डॉ.प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाचा ‘प्रकाशमार्गा:’ हा संस्कृत भाषेतील अनुवाद करण्याचे खडतर कार्य यशस्वीपणे पूर्ण केले.
मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नाते सांगणाऱ्या, गावखेड्यातले जीवन साहित्यातून मांडणाऱ्या, गाव व शहरातल्या बदलत्या संस्कृतीतले द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या लेखकांना मिळालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांना लिहिण्यासाठी प्रेरीत करेल, यातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.