अजब फंडा ! बैलबंड्यांद्वारे हाेतेय रेती तस्करी

*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*
गडचिराेली : रेती तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभागाने वैनगंगा नदीवरील काेंढाळा, कुरुड, आमगाव, सावंगी या घाटांवर जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खाेदल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती तस्करीला आळा बसला आहे. मात्र, आता बैलबंडीधारकांनी रेती चाेरी करण्यास सुरुवात केली आहे.
रेती घाटांवर अडीच ते चार फुटांपर्यंत रुंद नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र, आमगाव येथील बैलबंडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत, जो रेतीघाट बंद आहे ते सोडून त्यांनी आमगाव येथील अंत्यसंस्कार विधी पार पडतात, त्या घाटाची निवड करीत, तेथून रेती सिमेंट पिशव्यात भरून त्यांची विक्री देसाईगंज शहरात करत असल्याचे चित्र आहे.
आमगावातील बऱ्याच लोकांनी या कामासाठी बैलजोड्या विकत घेऊन रेतीची चाेरी करीत आहेत. बैलबंडीधारक पहाटेला देसाईगंज या शहरात रेती टाकण्यासाठी मार्गस्थ होतात. आमगाववरून हनुमान वार्डात मागील रस्त्याने शहरात प्रवेश करतात. सांगितलेल्या ठिकाणी रेती रिकामी करतात.
रेतीला व्यवसायाचे स्वरूप दिलेल्या एका बैलगाडीमधील रेती हजार ते बाराशे रुपयांना विकली जात आहे. शहरात या बैलगाड्या अतिसकाळच्या वेळेस व संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास या शहरात येतात. याप्रमाणे दिवसाला दोन खेपा मारतात. त्यापोटी दोन ते अडीच हजार रुपये पदरी पाडून घेत आहेत. मात्र, या बाबीकडे महसूल विभाग सहजतेने बघत असले, तरी याही माध्यमातून बऱ्याच प्रमाणात रेती तस्करी हाेत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.