empty-chairs-in-pm-rally
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला पाच लाखांऐवजी फक्त पाच हजार लोक होते उपस्थित
empty-chairs-in-pm-rally
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला पाच लाखांऐवजी फक्त पाच हजार लोक होते उपस्थित

सिद्धांत
७ जानेवारी २०२१: बुधवारी सुरक्षा व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पंतप्रधान मोदींना आपला पंजाबचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान फिरोझपूर जिह्यामध्ये विकासकामांचे उदघाटन करणार होते. त्याचबरोबर फिरोझपूर येथे एका राजकीय सभेमध्ये त्यांचे भाषण होणार होते. पंजाबच्या भाजपा नेत्यांकडून ह्या सभेला जवळपास पाच लाख जनतेची उपस्थिती जमणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु बुधवारी कार्यक्रमाच्या स्थळी फक्त पाच हजार व्यक्तींची उपस्थिती दिसून आली होती.

ट्रिब्युन इंडियन या वृत्तसंस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार पंजाब भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी पंतप्रधानाच्या सभेसाठी ५ लाख लोक जमविण्याच्या अंदाजाने तयारी केली होती. येत्या काळात पंजाब मध्ये निवडणूका होत असल्याने ह्या सभेला राजकीयदृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले होते. राज्यातल्या विविध भागातून लोकांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी भाजपने जवळपास ३२०० बसेसची व्यवस्था केली होती. परंतु लोकांनी सभेस येण्यास नापसंती दाखवल्यावर बसेसची संख्या कमी करण्यात आली होती. बुधवारी बस पार्किंगच्या ठिकाणी मूळ ३२०० बसेस ऐवजी फक्त ५०० बसेसची संख्या दिसून आली होती.

सभास्थळावरच्या खुर्च्या हि रिकाम्या दिसून आल्या होत्या. लोकांना बसण्यासाठी आणलेल्या ६५,००० खुर्च्यांपैकी फक्त ५००० खुर्च्या माणसांनी भरलेल्या होत्या. या घटनेनंतर पंजाबच्या भाजप मंत्र्यांनी पोलिसांवर कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांच्या गाड्या अडविण्यात आल्याचा आरोप केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बसेसना सुरक्षेच्या कारणास्तव थांबविण्यात आल्याची बातमी खरी होती, पण त्यांची संख्या फार कमी होती.

empty-chairs-at-pm-rally
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला पाच लाखांऐवजी फक्त पाच हजार लोक होते उपस्थित

नव्या कृषी कायद्यांमुळे भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांवर पंजाबमधील अनेक शेतकऱ्यांचा आधीच रोष होता. त्यातच शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान मोदींनी अपमानकारक विधान केल्याचे मेघालायचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांनी जाहीर केले होते. त्यामुळे पंजाबमधील जनतेचा या सभेला अगोदरपासूनच विरोध होता. आठवड्यापासून स्थानिक पातळीवर, गावातल्या गुरुद्वारांमधून शेतकरी संघटना सभेला न जाण्याचे आवाहन करत होत्या. पंजाब मधील जनतेने शेतकऱ्यांचे आवाहन मानल्याने भाजपच्या पंजाबमधील नेत्यांना सभेला गर्दी जमविण्यात अपयश आल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंतप्रधानांनी दौरा अर्धवट सोडून जाण्यामागे हेच कारण असावे असे विधान केले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाब पोलिसांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. परंतु दौऱ्याला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पंतप्रधान हा दौरा अर्धवट सोडून गेले. भाजपच्या नेत्यांकडून पंजाब पोलिसांवर करण्यात येणारी टीका चुकीची असल्याचेही ते पुढे म्हणाले. पंजाब काँग्रेसचे मुख्य नवज्योतसिंग सिद्धू यांनीही मुख्यमंत्र्याच्या या विधानाला दुजोरा दिला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here