इतिहासात भारताच्या पंतप्रधानांवर झालेले प्राणघातक हल्ले

69
attacks-on-prime-minister-in-india
इतिहासात भारताच्या पंतप्रधानांवर झालेले प्राणघातक हल्ले.

सिद्धांत
९ जानेवारी २०२२: भारताच्या शासन प्रणालीमध्ये पंतप्रधान पद अतिशय महत्त्वाचे असते. भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्रीय सरकारचे प्रमुख असतात. केंद्रीय सरकारमधील मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, कार्यक्षम मंत्र्यांची विविध पदांवर निवड करणे, देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या साहाय्याने योजनांची आखणी करणे करणे यांसारखी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला पार पाडाव्या लागतात.

सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानपद हे फार संवेदशील असते. त्यासाठी देशातील सर्वोत्तम सुरक्षाव्यवस्था भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरविली जाते. भारताच्या पंतप्रधानांचे संरक्षण करण्याची जबाबदारी “स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप” या सुरक्षा यंत्रणेची असते. समाजातील कृप्रवृत्तीच्या लोकांकडून, दहशतवादी गटांकड़ून पंतप्रधानाच्या जीविताला धोका असतो. भारताच्या इतिहासात आजवर झालेल्या पंतप्रधानांच्या जीविताला धोका पोहचवण्याच्या दृष्टीने अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यांपैकी इंदिरा गांधी यांची १९८४ साली तर राजीव गांधी यांची १९९१ साली अश्याच प्राणघातक हल्यांमध्ये हत्या घडवून आणण्यात आली होती.

जवाहरलाल नेहरू यांच्यावर झाले होते तीनदा प्राणघातक हल्ले
१९४८ साली सुरक्षा यंत्रणांना बिहारमधून चार व्यक्ती तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने दिल्लीला येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपासकार्य करत असताना पोलीस त्या चोघांपैकी एका व्यक्तीपर्यंत पोहचले. त्याने दिलेल्या माहितीनुसार पुढे इतर तीन व्यक्तींना बिहार पोलिसांनी लखीसराई येथून अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, रायफल्स आणि स्फोटके पोलिसांनी जप्त केली होती.

१९५३ साली जवाहरलाल नेहरू अमृतसर एक्सप्रेसने मुंबईला प्रवास करत होते. ज्यावेळी नेहरूंची ट्रेन कल्याण पासून दहा मिनिटांच्या अंतरावर असताना पोलिसांना कल्याण स्थानकाजवळील रेल्वे रुळांवर दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झाडझडती घेतली असता त्यांच्याकडे स्फोटक सापडली गेली होती. त्या स्फोटकांचा वापर करून अमृतसर एक्सप्रेसमध्ये विस्फोट करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला होता.

नेहरूंवर तिसरा प्राणघातक हल्ला १९५३ साली नागपूर येथे झाला होता. व्यवसायाने रिक्षा-चालक असलेल्या व्यक्तीचा जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या राजकीय धोरणांना प्रखर विरोध होता. त्या विरोधाच्या प्रभावाखाली त्याने नेहरूंच्या नागपूर भेटीदरम्यान त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरला वेळीच अडवल्याने नेहरुंवरचा धोका टळला होता.

राजीव गांधी यांच्यावर होणार होता अमेरिकेत प्राणघातक हल्ला
१९८५ साली ११ जूनपासून राजीव गांधी यांचा अमेरिकन दौरा सुरु होणार होता. त्याआधी १४ मे १९८५ रोजी अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर यंत्रणेने अमेरिकेत राहणाऱ्या गुरप्रताप बिर्क, लाल सिंग आणि अम्मानंद सिंग यांना राजीव गांधीची हत्या करण्याचा कट रचण्याबाबतच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. यावेळी एफबीआयच्या एक अधिकाऱ्याने “अंडरकव्हर एजन्ट” बनून ह्या हल्ल्याच्या कटाची माहिती उघड केली होती. १९८६ साली राजीव गांधी इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना लीसेस्टर शहरातून देखील चार भारतीय वंशांच्या व्यक्तींना अश्याच प्रकारच्या गुन्ह्याखाली ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती.

२ ऑक्टोबर १९८६ साली गांधी जयंतीनिम्मित राजघाटवर महात्मा गांधींच्या स्मारकाला अभिवादन करत असताना राजीव गांधीवर करमजीत सिंग नामक व्यक्तीने बंदुकीने गोळ्या झाडल्या होत्या. परंतु एकही गोळी राजीव गांधीना लागली नाही आणि ते त्या हल्ल्यातून सुखरूप बचावले. हल्लेखोर हल्ला करण्याच्या जवळपास दहा दिवस राजघाटावर लपून बसला होता. पुढे पोलिसांकडून अटक झाल्यानंतर करमजीत सिंगला १४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ह्या हल्ल्यातून राजीव गांधी बचावले होते, तरी नंतर १९९१ मध्ये एलटीटीइद्वारे सुसाईड बॉम्बर बनून आलेल्या थेनमोझी राजरत्नम यांनी घडवून आणलेल्या आरडीक्सच्या स्फोटामध्ये राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.