
सिद्धांत
९ जानेवारी २०२२:आपला भारत म्हणजे विविध भाषांनी, विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश. इथे काही किलोमीटरच्या अंतरावर भाषा बदलतात, खाद्य संस्कृती बदलतात. भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असणारा सण म्हणजे दिवाळी. पण विविधतेने नटलेल्या भारत देशात दिवाळीसुद्धा विविध प्रथा – परंपरेने साजरी केली जाते. दिवाळी दरम्यान काही ठिकाणी आदिवासी आपल्या पाळीव प्राण्यांची पूजा करतात, तर काही लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी प्राथर्ना करतात. भारतातल्या काही ठिकाणी तर दिवाळी साजरीच केली जात नाही..चला तर मग फटाके फराळाच्या शहरी दिवाळीकडच्या पलीकडची भारताच्या कानाकोपऱ्यात साजरी होणाऱ्या दिवाळी बद्दल माहिती घेऊया.
गुजरात: नर्मदा आणि भरूच भागातील आदिवासी समाजाचा दिवाळी उत्सव जवळपास १५ दिवस सुरु राहतो. या दरम्यान ते जंगलातील विविध सुंगंधी झाडांच्या फाद्यांना जाळतात. त्यापासून निघणारा धूर आरोग्यदायी असतो अशी या इथल्या लोकांची समज आहे. अश्या सुंगंधी झाडांच्या फाद्यांच्या मशाली बनवून गावातून मिरवणूक काढली जाते आणि त्यावेळी येथील आदिवासी समाजाचे लोक आपले पारंपारीक नृत्य सादर करतात. विलक्षण बाब म्हणजे या सणादरम्यान ते कोणत्याही देव – देवतेची पूजा करत नाही. या भागातील आदिवासी लोकांचा दोनच देवतांवर विश्वास असतो – माती जी धान्य पिकवायला उपयोगी ठरते आणि आकाश जे आपल्याला पाऊस देते. त्यामुळे दक्षिण गुजरात भागातील पंचमहल आणि डांग पट्ट्यातील आदिवासी लोक दिवाळीचे पंधरा दिवस केवळ निसर्गाची पूजा करतात.
छत्तीसगढ: छत्तीसगढ राज्यातील बस्तर येथे दिवाळीदरम्यान तीन दिवसांचा ” दियारी” हा सण साजरा केला जातो. यावेळी शेतातील पिकांचा हिंदू देवता नारायण यांच्यासह विवाह लावला जातो. गुरांची राखण करणाऱ्या लोकांचा गावठी दारू आणि हार देऊन सत्कार करण्यात येतो. महाराष्ट्रातील बैलपोळ्यासारखच दियारी सणाच्या दरम्यान बस्तरमधील आदिवासी समाजतर्फे बैल आणि गायींना सजवून त्यांची पूजा केली जाते. बहुसंख्येने गोंड समाजाची वस्ती असलेल्या बस्तर जिल्ह्यामध्ये दियारी सणापासून तरुण तरुणीचे विवाह संबध जोडण्याच्या तयारीला सुरुवात होते.
उत्तराखंड: उत्तराखंड राज्याच्या जौनसार – बावर सारख्या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांची दिवाळी पारंपरिक दिवाळीपेक्षा जवळपास महिन्याभरानंतर सुरु होते. दोन दिवस चालणाऱ्या ह्या सणाला ” दियाई” म्हटले जाते. दियाई सण सुरु होण्याच्या सातव्या, नवव्या आणि अकराव्या दिवसांअगोदर महिला विविध रोपट्यांच्या बियाण्याची लागवड करतात, या रोपट्यानां डिबसा म्हटले जाते. दियाई सण सुरु होण्याच्या आदल्या रात्री लोक जागरण करतात, यावेळी देवदारच्या फांद्या जाळल्या जातात आणि त्यामध्ये डिबस्याची रोपटी जाळली जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. त्यानंतर गावकरी अक्रोड फळाचा प्रसाद घेऊन गावातल्या मंदिरात दर्शनासाठी जातात. सणाच्या दुसऱ्या दिवशी शेतामध्ये दिवे – पणत्या लावून रोषणाई केली जाते.
ओडिसा: ओडिशामधील काही भागात दिवाळी फार वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या सणाला “कौनरिया काथी” म्हटले जाते. या सणादरम्यान तागाच्या फांद्या जाळण्याची प्रथा आहे. इथल्या लोकांची त्यांचे पूर्वज खुल्या आकाशात राहत असल्याची समज आहे. तागाच्या फांद्या जाळण्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान ओडिशामधील लोक पुरी येथील जगन्नाथ मंदिरांच्या बाहेर जमतात आणि आपल्या पूर्वजांसाठी प्राथर्ना करतात. तसेच ओडिसामध्ये दिवाळी सणाच्या दरम्यान कालीमाता देवीची पूजा केली जाते.
उत्तरप्रदेश: दिवाळी सणाच्या काही दिवस अगोदर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी देशात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. परंतु उत्तरप्रदेश मधील नोएडा येथील बिसरख गावात विलक्षण प्रथेने दसरा आणि दिवाळीचे दिवस साजरे केले जातात. स्थानिक दंत कथांनुसार बिसरख गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. ज्यावेळी देशभरातून रावणवध साजरा केला जातो, त्यावेळी या गावामध्ये रावणवध दुःखद घटना मानली जाते. त्यामुळे पुढील काही दिवस या गावामध्ये रावणवधाचा दुखवटा पळाला जातो. या गावामध्ये रावणाचे हजार वर्षापूर्वीचे मंदीर आहे, जिथे दिवाळी सणाच्या दरम्यान रावणासाठी यज्ञ आणि प्राथर्ना केल्या जातात.