मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा कोस्टल रोड, मावळ्याने केली विक्रमी कामगिरी

56
मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा कोस्टल रोड, मावळ्याने केली विक्रमी कामगिरी.

मीडिया वार्ता न्युज
११ जानेवारी २०२२: मुंबई कोस्टल रोड हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, अश्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड योजनेचे वर्ण केले होते.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन दि. 10 जानेवारी 2022 रोजी पूर्ण झाले. ११ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍पापैकी सुमारे ५० टक्‍के काम पूर्ण असून डिसेंबर २०२३ मध्‍ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री या प्रोजेक्टबद्दल पुढे म्हणले कि, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य व पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.