शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले

57

शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले

शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपून काढले. गेल्या तीन दिवसात झालेल्या या पावसाचा 11 तालुक्यांना जबर फटका बसला.जिल्ह्यातील 571 गावे बाधित झाली असून, 8 हजार 850 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तर, 4 हजार 750 हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांचे हाल झाले आहे.
गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. सलग पाच दिवसांपासून शुक्रवारही जिल्ह्यातील काही भागात पाऊस बरसला. या पावसाने रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, मूंग, भाजीपाला, लाखोळी, करडई या पिकांचे अतोनात नुकसान केले. तर खरीप हंगामातील तूर व अंतिम टप्यातील कापूस पिकालाही या पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सावली, भद्रावती, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, राजुरा, जिवती व पोंभूर्णा तालुक्यातील जवळपास 571 गावांतील 8 हजार 850 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. 4 हजार 750 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. गुरूवारपासून पुन्हा अवकाळी पाऊस सुरूच असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा खरीप हंगामातही निसर्गराजाने वक्रदृष्टी दाखवली. खरीपातील भरपाई रब्बीत निघेल, या आशेने बळीराजा नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी सज्ज झाला. पण, या हंगामातही निसर्ग कोपला. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी दिली.
महानगरातील रस्ते जलमय
गुरूवारी मध्यरात्री महानगरात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने नाल्यांतील पाणी रस्त्यांवर साचले. शुक्रवारी सकाळी महानगरातील रस्त्यांवर नाल्यांतील घाण बघायला मिळाली. युद्धपातळीवर स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत होते. वारंवार नाल्या व गटारे स्वच्छ करीत असतानाही नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर वाहल्याने मनपाच्या स्वच्छता मोहिमेचा बोजबारा उडाल्याचे चित्र होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून मेघगर्जनेसह दमदार पावसाने झोडपले. या पावसाने कामानिमित्त कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची धांदल उडाली.

सिंदेवाही, भद्रावतीत गारपीट

शुक्रवारी दुपारच्या सुमारास महानगरासह सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. सिंदेवाही, भद्रावती तालुक्यात गारपीट झाली. तर, राजुरा व बल्लारपूर तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले. पोंभूर्णा, कोरपना, ब्रम्हपूरी, नागभीड, चिमूर, वरोडा या तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तर, अन्य तालुक्यात सायंकाळी 4 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आता शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.