वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका,माहूल येथे प्रतिदिन १५ मेट्रिक टन प्राणवायू वापरुन १५०० जंबो सिलेंडर्स तर महालक्ष्मी प्रकल्पामध्ये प्रतिदिन १०० ते १२० ड्युरा सिलेंडर्स भरण्याची क्षमता
मीडिया वार्ता टीम
१७ जानेवारी २०२२: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायूरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱया ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाचे उदघाटन करताना काढले.
माहूल स्थित वायूरुप वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयीः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वायूरुप वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलेंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारला आहे. सुमारे ८५० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर हा प्रकल्प साकारला आहे. येथे एकूण ३ तीन कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी केली आहे. बीपीसीएल मुंबई रिफायनरीने या प्रकल्पासाठी हातभार म्हणून सार्वजनिक उत्तरदायित्व स्वरुपात संयंत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत, बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील बीपीसीएलने टाकली आहे.
बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होते. पैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वायूरुप वैद्यकीय प्राणवायू महानगरपालिकेच्या माहूलमधील सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या पुनर्भरण प्रकल्पामध्ये ७.१ घनमीटर क्षमतेचे सुमारे ११२ सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये सुमारे ८०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. २४ तासांच्या तीन सत्रात मिळून, १५ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाल्यास त्यातून किमान १ हजार ५०० जंबो सिलेंडर भरले जावू शकतात. प्राणवायूच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची तरतूद देखील करण्यात आली आहे. पुनर्भरण केलेले सिलेंडर्स रुग्णालयांपर्यंत वाहून नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वतःची वाहतूक व्यवस्था देखील उभी केली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे १३ हजार लीटर द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवता येईल, इतकी मोठी टाकी आहे. या प्रकल्पामध्ये एकाचवेळी प्रत्येकी २१० लीटर क्षमतेचे १० सिलेंडर्स भरता येवू शकतात. या प्रकल्पाची दररोज १०० ते १२० सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. त्याच्या प्रचालनासाठी प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. तसेच, सिलेंडर्स वाहतुकीसाठी २ विशेष परावर्तित वाहनेदेखील नेमण्यात आली आहेत. वापरात असलेल्या वाहनांमध्येच आवश्यक ते बदल करुन ती उपलब्ध करण्यात आल्याने, नवीन वाहने खरेदीचा खर्च वाचला आहे, हेही महत्त्वाचे आहे. एकूणच, या प्रकल्पाच्या उभारणीमुळे ड्युरा सिलेंडर पुनर्भरणाचा खर्च सुमारे ३५ ते ४० टक्के कमी झाला असून यातून महानगरपालिकेची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.