नापिकी, कर्जाला होते कंटाळले, विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा.
यवतमाळ–अमरावती :- सततची नापिकी आणि कर्जाबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे दोन शेतकरी प्रत्येकी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील आहेत.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव ता. आर्णी येथील शेतकरी कैलास दगडू पवार वय ४५ यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात २६ तारखेला घरात विषप्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३० ऑक्टोबरला त्यांचा त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व सून व मोठा परिवार आहेत.
दुसरी आत्महत्याची घटना अमरावती जिल्ह्यातील खानापूर येथे घडली. अमरावती शहरालगतच्या खानापूर येथील युवा शेतकरी तुषार ज्ञानेश्वर अवघड (वय २२) याने सततच्या नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्याने घरातील खोलीत पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. मोठा भाऊ चेतन अवघड यांनी नांदगावपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली आहे.