
सिद्धांत
२६ जानेवारी: आज भारत देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी १९५० साली स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आणले गेले. या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळपास तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित संविधानाची निर्मिती केली. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातर्फे भारतीय नागरिकांना काही हक्क आणि अधिकार बहाल केले, ज्याच्यामुळे स्वतःची आणि समाजाची प्रगती करण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना मिळाले आहे.
ह्या हक्कांचा आणि अधिकारांचा वापर करताना नागरिकांनी सामाजिक स्वास्थ्य कायम राहील याचे भान राखणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात समाजातील प्रत्येक स्तरावरील अन्यायग्रस्त लोकांसाठी लढा दिला, त्यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गांची निर्मिती करून समतेवर आधारित समाज निर्मितीची प्रेरणा आपल्या विचारातून मांडली.
आज कित्येक दशकानंतरही बाबासाहेबांचे विचार भारतातीलच नव्हे तर जगभरातील भरकटलेल्या समाजाला दिशा देत असतात. आज ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या खालील काही विचारांचे मंथन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
- तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या प्रगतीची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.
- भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाहू इच्छित नाही. प्रथम भारतीय, नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीयाच्या पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी.
- संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.
- जर पक्षांनी स्वत:च्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
- भक्ती किंवा विभूति-पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारी ठरते.
- तुमच्या मतांची किंमत मीठ-मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच; किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे, विसरू नका.
- बुद्धीचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
- विज्ञान आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.
- ज्याप्रमाणे माणूस नश्वर असतो त्याचप्रमाणे [मनुष्याचे] विचार सुद्धा नश्वर असतात. एखाद्या झाडाला जशी पाण्याची गरज असते त्याप्रमाणे एखाद्या विचारालाही प्रचार-प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा, दोन्हीही मुरडतात आणि मरतात.
- आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपणाला चढवून इतरांनी आंधळेपणाने त्यांच्या मागे धावत जावे, हे मी तरी कुमकुवतपणाचे लक्षण मानतो.