त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ मौन पाळून थांबता येणार नाही, तर गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे

मीडिया वार्ता न्युज
३१ जानेवारी २०२२
मुंबई: महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार’ या विषयावर श्री.केतकर आणि श्री.शिर्के यांच्या व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.महात्मा गांधी यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असून जगभर ते प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांनी केले. अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि सत्याग्रहाचे गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, महात्मा गांधी ही विचारधारा आहे. त्यांच्या विचारांचे अनुयायी जगभर आढळतात. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग पासून बराक ओबामा तसेच रशियाच्या गोर्बाचेव्ह पर्यंत महासत्तांचे राष्ट्राध्यक्ष देखील गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेत असत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ मौन पाळून थांबता येणार नाही, तर गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शस्त्रास्त्रे ही केवळ विध्वंस करू शकतात असा विचार मांडणाऱ्या गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून सत्याग्रहाच्या मार्गाने त्याचा प्रसार केला. सर्वांना सुखा-समाधानाने जगायचे असेल तर सर्वांना अहिंसेच्या मार्गानेच जावे लागेल, या त्यांच्या विचाराने जगभर प्रेरित झालेले अनेकजण आजही त्यांचा विचारांचा प्रसार करताना आढळतात.
अमेरिका आणि रशिया महासत्ता झाले आणि जगात दोन गट तयार झाले. तथापि, सर्व जग एक असावे अशा विचारांमुळे पं.नेहरूंच्या पुढाकाराने अलिप्त राष्ट्रांची संघटना स्थापन झाली. यात पुढे 169 देश सहभागी झाले. याद्वारे गांधीजींचा विचारच नेहरूंनी पुढे नेल्याचे श्री.केतकर यांनी सांगितले.