8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान बालदिवस सप्ताह

49

*8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान बालदिवस सप्ताह*

*बालमित्रांनो, चाचा नेहरुंना पत्र लिहा*….!

*शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन*

            मुंबई, दि. 6 : बालमित्रांनो, आपल्या मनातील विचार चाचा नेहरुंना पत्र लिहून कळवा, नाही तर स्वतःच चाचा नेहरू बनून ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर आपला व्हिडीयो बनवा. एखादी कविता सादर करा, नाहीतर नेहरूजींच्या जीवनातील कथा सादर करा. आणि #baldivas२०२० हा हॅशटॅग वापरून अपलोड करा. प्रशस्तीपत्र आणि पारितोषिके जिंका, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड  यांनी केले आहे.

बालमित्रांसाठी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारा बालक दिन यावर्षी पुर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे,  अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि. 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

या सर्व उपक्रमांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे. या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ हे सोशल मिडिया जसे फेसबुक, Instagram, Twitter यावर आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन #baldivas२०२० या हॅशटॅगचा वापर करुन अपलोड करावेत. www.maa.ac.in या वेबसाईटवर देखील अपलोड करु शकता. बालदिवस सप्ताहाच्या अनुषंगाने तालुकास्तर, जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर रोख स्वरुपातील बक्षिसे व प्रशस्तीपत्र आहेत. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याची सुविधा देखील केलेली आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी आवाहनात म्हटले आहे.

कोणते उपक्रम राबविले जातील?

बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत पुढील उपक्रम राबविले जाणार आहेत.

•          दि. 08 नोव्हेंबर 2020, इयत्ता 1 ली व 2 री, भाषण- ‘मी नेहरु बोलतो’ या विषयावर 3 मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे.

•          दि. 9 नोव्हेंबर, 2020, इयत्ता 3 री ते 5 वी, पत्रलेखन-चाचा पं.नेहरुंना पत्र लिहा. (शब्द मर्यादा 300) पत्र A4 साईज कागदावर लिहून अपलोड करणे.

•          दि. 10 नोव्हेंबर, 2020 इयत्ता 6 वी ते 8 वी, स्वलिखित कविता वाचन-पं.नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करुन त्याचा व्हिडिओ अपलोड करणे.

•          दि. 11 नोव्हेंबर, 2020, इयत्ता 6 वी ते 8 वी, नाट्यछटा/एकपात्री-पं. नेहरुंजीच्या जीवनावर आधारीत 3 मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे,

•          दि. 12 नोव्हेंबर, 2020, इयत्ता 9 वी ते 10 वी, पोस्टर करणे-स्वातंत्र्य संग्रामातील पं.नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे. इयत्ता 11 वी ते 12 वी, निबंध लेखन-1) स्वातंत्र्यसंग्रामातील नेहरुंचे योगदान 2) पं. नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे, 3) पं.नेहरु-विज्ञान व तंत्रज्ञान (शब्द मर्यादा 900 ते 1000) निबंध लिहून अपलोड करणे.

•          दि. 13 नोव्हेंबर, 2020, इयत्ता 11 वी ते 12 वी निबंध लेखन- 1) पं.नेहरु-स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण-घडणातील वाटा, 2) पं.नेहरु-भारताचा शोध आत्मचरित्र (शब्द मर्यादा 700 ते 800) निबंध लिहून अपलोड करणे, व्हिडीओ तयार करणे- पं.नेहरुंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे, (5 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे),

•          दि. 14 नोव्हेंबर, 2020, इयता 1 ले ते 12 वी, बालसाहित्य ई-संमेलन-पं.नेहरुंशी संबंधीत कथा, कविता, प्रसंग साद करणे (स्वरचित) वेळ 3 मिनिट.