आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱
लाखनी : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने शेतातील मोहफुलाच्या झाडाला धोतराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेदरम्यान उघडकीस आली. मुंशी धोंडू बुराडे (७०, रा. लाखोरी ता. लाखनी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकरी बुराडे यांचेकडे अंदाजे एक हेक्टर शेतजमीन असून त्यात ते धानाचे पीक घेतात. चालू खरीप हंगामात त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, लाखोरीकडून ४० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. तसेच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.
घरकुल बांधकामाकरिता नातेवाइक व मित्रमंडळींकडून काही रक्कम उसणवार घेतली होती. खरीप हंगाम २०२१ मधील धान्य शासकीय धान खरेदी केंद्रावर विकले. पण दोन महिन्याचा कालावधी लोटूनही त्यांचे बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आपण मुदतीत सोसायटीचे कर्ज भरू शकत नाही तथा घरकुल बांधकामासाठी घेतलेल्या उसणवार रकमेची वेळेवर परतफेड करू शकत नाही.
यामुळे ते विषन्न मनस्थितीत असायचे. वातावरणातील बदलामुळे उन्हाळी धानाचे पन्हे (नर्सरी) गेल्यामुळे त्यांचे मनावर परिणाम झाला होता. सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतावर जातो, असे सांगून निघाले पण घरी परत आले नाही. दुपारच्या सुमारास कुटुंबीय शेतावर गेले असता शेतातील मोहफुलाच्या झाडाला धोतराने गळफास लावलेल्या अवस्थेत बुराडे याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.