लतादीदींचा जीवनप्रवास पाहूया त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांमधून

63
लतादीदींचा जीवनप्रवास पाहूया त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांमधून

सिद्धांत
७ फेब्रुवारी, मुंबई: काल सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकरांचे निधन झाले, आणि भारताच्या कला इतिहासातील एका स्वर्गीय युगाचा अंत झाला. आपल्या ९२ वर्षांच्या आयुष्यात लता दीदींनी ३६ भाषांमध्ये तब्बल ३० हजाराहून जास्त गाणी गायली. त्यांच्या आवाजामुळे भारून भारतातील अनेक पिढयांना संगीताची गोडी लागली. अनेक प्रसिद्ध संगीतकारांनी लतादीदींकडून प्रेरणा घेऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. लतादीदींचे निधन झाले असले तरी त्यांचा आवाज भविष्यातील अनेक पिढयांना प्रेरणा देत राहणार आहे. तब्बल सात दशकांचा हा सुरमयी जीवनप्रवास पाहूया लतादीदींच्या काही दुर्मिळ छायाचित्रांमधून.

लतादीदींचा जन्मच कलाकार घराण्यात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर १९३० च्या दशकात नाटक कंपनी चालवत असत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून लता दीदींनी संगीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

आपल्या भावंडांमध्ये वयाने मोठ्या असलेल्या लता दीदींना चार भावंडे होती. मीना,आशा, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावंडाना सांभाळून घेण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पडली होती.

सुरुवातीच्या काळातील आपल्या स्ट्रगलबद्दल लता दीदी सांगत कि, मला आयष्याने खूप काही शिकवले. काही लोकांनी माझ्या साधेपणाचा फायदा घेत मला फसवलेही असेल, परंतु मला लोंकाना मदत करण्यावर माझा नेहमीच विश्वास होता.

१९५० नंतर लतादीदींची बॉलीवूडमधील खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या दशकात त्यांनी देवदास, सजा, श्री ४२०, बरसात, चोरी चोरी,अलबेला, दिदार सारख्या चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला. १९५८ साली ” आज रे परदेशी” या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. फिल्मफेअर अवॉर्डची ट्रॉफी हि एका निर्वस्त्र स्त्रीच्या आकाराची असल्याने लतादीदींनी फिल्मफेअर अवॉर्ड घेण्यास नकार दिला होता, शेवटी आयोजकांनी एका हातरुमालात गुंडाळून ती ट्रॉफी लतादीदींना प्रदान केली.


लता दीदींना कुत्र्यांचा फार लळा होता. आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो त्या आवडीने सोशल मीडियावर टाकत असत.

 

 

 

 

 

 

 

 

 

१९६३ साली दिल्लीमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या उपस्थित लतादीदींनी मेरे वतन के लोगो हे गायले होते. ते ऐकताना पंतप्रधान नेहरूंचे डोळे पाणावले होते.

 

बॉलिवूडच्या चकाकत्या दुनियेत आपल्या साधेपणाचा वेगळाच ठसा उमटवणाऱ्या लता दीदींनी अनेक कलाकारांना बाल्यावस्थेपासून मोठे होऊन चित्रपटसृष्टी गाजवताना पहिले होते. दिवंगत अभिनेता   ऋषी कपूर यांनी आपल्या लहानपणीचा लतादीदींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता.

१९८३ साली भारतीय संघाने क्रिकेटचा विश्वकप जिंकल्यानंतर बीसीसीआय तर्फे खेळाडूंना पुरस्काराच्या स्वरूपात निधी देण्याचे ठरविण्यात आले होते. हा निधी उभारण्यासाठी लतादीदींनी दिल्लीमध्ये कोणताही मोबदला न घेता आपल्या गाण्याचा एक कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमातून जमा झालेला निधी खेळाडूंना पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आला होता. तेंव्हापासून भारताच्या प्रत्येक सामन्यांदरम्यान लता दीदींसाठी दोन तिकीट कायमच राखून ठेवण्यात येत असत.

संगीत क्षेत्रातील लतादीदींच्या अतुलनीय कामगिरीसाठी मार्च २००१ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.

“मेरी आवाज हि मेरी पहचान है” असे गाणाऱ्या लतादीदींचा आवाज खरंच रसिकांच्या मनात अमर राहणार आहे.