युक्रेन मध्ये फसलेल्या मुलाने मोबाइल कॉलद्वारे संवाद साधत चिंतेतील कुटुंबीयांना दिला धीर

56

युक्रेन मध्ये फसलेल्या मुलाने मोबाइल कॉलद्वारे संवाद साधत चिंतेतील कुटुंबीयांना दिला धीर

युक्रेन मध्ये फसलेल्या मुलाने मोबाइल कॉलद्वारे संवाद साधत चिंतेतील कुटुंबीयांना दिला धीर

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

शंकरपूर, चिमूर : आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी सुखरूप आहे. सध्या मी युक्रेनची सीमा पार करून रुमानिया देशातील हद्दीत पोहोचलो आहे.परिस्थिती काहीशी निवळल्यानंतर भारताचे विमान मिळाल्यास भारतात परत येईन, असे मोबाइल कॉलद्वारे संवाद साधत चिंतेतील कुटुंबीयांना मुलाने धीर दिला.
हर्षल बळवंत ठवरे (२१ वर्षे), रा. चिचाळा, तालुका चिमूर हा विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वी गेला आहे. रशिया व युक्रेनच्या युद्धात हर्षल युक्रेनमध्ये अडकून राहिला आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारतात परत येण्यासाठी वडिलांनी चार दिवसआगोदरच पैसे पाठविले होते; परंतु रशियाने युक्रेनच्या राजधानीच्या विमानतळावर हल्ला केल्याने विमानसेवा बंद करण्यात आल्याने हर्षल अडकून पडला आहे. शनिवारी दुपारी हर्षल ठवरे याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता सर्व विद्यार्थी सुखरूप आहोत. युक्रेन देशाची सीमा पार करून रुमानिया देशाच्या हद्दीत पोहोचलो आहोत. परिस्थिती काहीशी निवळल्यानंतर व भारताचे विमान मिळाल्यावर भारतात परत येऊ, असे सांगितले.

युक्रेनमधून सुरक्षितस्थळी पोहोचणे महत्त्वाचे
– शुक्रवारीच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक व विद्यार्थ्यासाठी हंगेरी, पोलंड व रोमानिया या देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. आम्ही जिथे राहतो तेथून टॅक्सी अथवा बसने या देशात पोहोचायचे आणि तिथून भारत सरकारच्या विमानाने मायदेशी परतायचे, असे साधारण नियोजन आहे; पण अगोदर युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर सुरक्षित स्थळी पोहोचणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे शनिवारी दुपारी मी रुमानिया देशाच्या सीमेत पोहोचल्याचे हर्षल ठवरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा ३५ ते ४० किमीचा पायदळ प्रवास
– युक्रेनमधील भारतीय दुतावासाने विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी पोलंड या देशात बस पाठविली आहे. परंतु त्या रस्त्यावर वाहनाची एवढी गर्दी झाली आहे की संपूर्ण वाहतूक खोळंबली आहे.
– त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना ३५ ते ४० किमी पायी प्रवास करावा लागत आहे.
– जवळपास ३५० भारतीय विद्यार्थी पायी प्रवास करीत आहेत.

बाळा काळजी घे रे… आईची विनवणी !
शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता पुन्हा ठवरे कुटुंबीयांनी हर्षलशी संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. बाळा काळजी घे रे… आणि लवकर परत ये, बस्स एवढंच ती बोलू शकली.

लेकरू सुखरूप असेल ना!
– शंकरपूर येथील प्रफुल्ल खोबरागडे यांची मुलगी ऐश्वर्या खोबरागडे ही युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पाचवा वर्षाला शिकत आहे. परंतु रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरू आहे.
– अशा परिस्थितीत आपले लेकरू सुखरूप असेल ना, अशी चिंता खोबरागडे दाम्पत्याला आहे. ऐश्वर्या खोब्रागडे हिला भारताच्या दूतावासाने तेथील इतर विद्यार्थ्यांसोबत पांढऱ्या रंगाच्या बसमध्ये बसून पोलंडला रवाना झाली आहे.
– हा प्रवास १३ तासांचा आहे. तिथून हे विद्यार्थी भारतात परत येतील. परंतु या प्रवासादरम्यान काही ठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याची माहिती पालक प्रफुल खोब्रागडे यांनी दिली.