पुणे छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे फोडले, आरोपी फरार
पुण्यातील शिरूर परिसरात छेडछाडीचा विरोध करणाऱ्या महिलेवर हल्ला करून, तिचे डोळे फोडण्याची गंभीर घटना समोर आली आहे.
पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावरील शिरूर परिसरात घडली आहे. 37 वर्षांची महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीचा जोरदार विरोध केला तर, आरोपीने महिलेवर हल्ला केला. ज्यात तिच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, “ही घटना बुधवारी रात्री घडली. ही महिला शौचालयासाठी घराबाहेर पडली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
ही महिला अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. पोलीस या महिलेकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत या महिलेच्या डोळ्यांना इजा कशी झाली याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.