शेतकऱ्यांचा लाखणी महावितरण वर धडक मोर्चा

शेतकऱ्यांचा लाखणी महावितरण वर धडक मोर्चा

शेतकऱ्यांचा लाखणी महावितरण वर धडक मोर्चा

✍मुकेश मेश्राम✍
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा. भंडारा

भंडारा/लाखनी : तालुक्यातील मुरमाडी/तुप परिसरात उन्हाळी धानासोबतच अन्य पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वीज वितरण कंपनी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर केले.
कृषिपंपाला नियमित आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, वीज वितरण कंपनीने सूचना न देता बंद केलेले विद्युत जनित्र पूर्ववत सुरू करावे, कृषिपंपाच्या मीटरचे रीडिंग न घेता पाठविण्यात आलेली देयके रद्द करून सुधारित देयके पाठविण्यात यावी, बंद पडलेल्या विद्युत मीटरच्या जागी नवीन मीटर लावणे, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीजजोडणी देण्यात यावी, वीज बिलावरील सबसिडीला ३१ मार्चऐवजी ३१ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, या मागण्यांकरिता मुरमाडी/तुप परिसरातील शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा समर्थ क्रीडांगणावरून निघून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे निवेदन देऊन नंतर उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर नेण्यात आला. उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे यांच्याशी समस्यांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. मोर्चात शेकडो शेतकऱ्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या.चर्चेत जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुळे, पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, जि. प. माजी सदस्य आकाश कोरे, पळसगावचे सरपंच विलास सार्वे, माजी सरपंच शालिक शिवणकर, सामाजिक कार्यकर्ते शेषराव शिवणकर, संजय हेमने, पिंटू बावनकुळे, पतिराम जवंजाळ, किशोर चेटूले यांचा सहभाग होता.