संकटाच्या वेळी फक्त शिवसेनाच मदतीला धाऊन येते – अनिल देसाई
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
हदगाव : काल तुमचे दोन आमदार होते. आज शंभर असतील. उद्या कदाचीत तीनशे असतील पण एक लक्षात ठेवा शेवटी आम्ही आम्हीच आहोत. शिवसेनाच संकटाच्या वेळी धाऊन येते, हे जनतेला चांगले माहित असल्यानेच जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी भाजपचे नाव न घेता व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानातंर्गत हदगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार देसाई हे आले होते. यावेळी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे आदी उपस्थित होते.
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर आदींनी स्वागत केले. श्री. देसाई म्हणाले की, ज्या काळात महाराष्ट्राबाहेरचे लोकं मुंबईवर काबीज होत होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी पुढाकार घेऊन मराठी माणसांना न्याय दिला आणि सत्तेची चावी आपल्या हातात असावी या मुंबईकरांच्या आग्रहाखातर त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुखांनी एक भगव्या नात्याचा परीवार तयार केला. रक्ताच्या नात्यासारखे घट्ट नाते असलेले शिवसैनिक तयार केले. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. पण तोच खंजर हातात घेऊन उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आव्हान दिले हेही तुम्हाला विसरून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.