भारत माझा देश आहे , इंडिया तुमचा देश आहे.
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
हि उभी फुट आहे आणि कुणी कितीही नाकारली तरी ती अस्तित्वात आहे , ठळकपणे.
चार-पाच-दहा-पंधरा पदरी रस्ते बांधायचेत, त्यावरून सुसाट गाड्या धावणार आहेत मात्र त्यासाठी जमिनी लागतात.
शेतकऱ्यांनी विकासाला विरोध न करता जमिनी द्यायला पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवा.
बुलेट ट्रेन येणारेय, त्यावरून गोळीच्या वेगाने रेल्वे धावणार आहेत मात्र त्यासाठी जमिनी लागतात.
शेतकऱ्यांनी विकासाला विरोध न करता जमिनी द्यायला पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवा.
शहरीकरण वाढत चाललेलं आहे , लोकांना प्यायला पाणी मिळत नाहीये, मोठी धरण बांधायला पाहिजेत मात्र त्यासाठी जमिनी लागतात.
शेतकऱ्यांनी विकासाला विरोध न करता जमिनी द्यायला पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवा.
वीजेची मागणी वाढलेली आहे , पुरवठा करायला औष्णिक वीज केंद्र उभारायचं आहे , त्यासाठी कोळसा लागतो कोळसा काढायला जंगल तोडली पाहिजेत.
आदिवासींनी विकासाला विरोध न करता जंगलातून बाहेर पडल पाहिजे.
कारण कुणीतरी त्याग करायला हवा.
समुद्रकिनारी तेलाचा प्रकल्प उभारला तर वाहतूक सोयीची होईल , विकासाला इंधनाची गरज आहे त्यासाठी जमिनी लागतात.
कोकणी लोकांनी विकासाला विरोध न करता जमिनी दिल्या पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवाय.
गाय हमारी माता है , आम्हाला गोवंशाचे रक्षण करायचे आहे आमची महान संस्कृती जपायची आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी भाकड गायी बाजारात विकल्या नाही पाहिजेत.
शेतकऱ्यांनी संस्कृतीसाठी भाकड गायी पोसल्या पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवाय.
शहरातल्या मध्यमवर्गीयांना इतक्या कमी पगारात जगायला परवडत नाही म्हणून त्यांना स्वस्तात भाजीपाला, दुध, धान्य मिळाल पाहिजे.
महागाई कमी करायला शेतमालाला भाव मर्यादितच मिळाले पाहिजेत.
कारण कुणीतरी त्याग करायला हवाय.
हा इंडिया नामक देशातल्या शहरातल्या मध्यमवर्गाला लाईट, पाणी, गुळगुळीत रस्ते, विनाथांबा जाण्यासाठी एक्सप्रेस हायवे , स्वस्तातला भाजीपाला, धान्य हे सगळ मिळायला दरवेळेला भारताने का म्हणून त्याग करावा ?
त्याग शेतकऱ्यांनी का करायचा ?
त्याग आदिवासींनी का करायचा ?
त्याग कोकणी माणसांनी का करायचा ?
त्यागाचा ठेका त्यांना दिलाय कुणी ?
बिल्डिंगमध्ये टीचभर पार्किंग साठी कचाकचा भांडणाऱ्या माणसांना, सोसायटीच्या दारात काठी घेऊन रखवालदार ठेवून “ गेस्ट पार्किंग नॉट अलाउड “ म्हणून पाट्या लावणाऱ्या माणसांना त्याग करावासा का वाटत नाही ?
संस्कृतीच्या डिंग्या मारणाऱ्या लोकांची पाचव्या मजल्यावर गच्चीत ,टेरेसवर भाकड गाय आणून पोसायची दानत का होत नाही ?
सरकार कुठलही असुद्या हो, सगळे चोर ह्या इंडियातल्या शहरात एकवटलेल्या मध्यमवर्गाला गोंजारायला नेहमी भारताची ठासतात.
आणि हे मग हे त्यागाच्या महान संस्कृतीचे गोडवे गाणारे आरामखुर्चीत बसल्या बसल्या मोबाईलवर बोट आपटून विचारणार, “ कोकणात झाला प्रकल्प तर बिघडल कुठ ? हायवे आला कि थोडीफार झाड कापली जाणारच ? कुणीतरी विकासासाठी त्याग करायला नको का ? “
का म्हणून इंडियाच्या विकासासाठी भारतानेच दरवेळेला त्याग करायचा ?
भारताच्या विकासासाठी इंडियाने त्याग कधी करायचा आहे ?
आम्ही_भारताचे_लोक विकास_कुणाचा_भकास_कोण
प्रश्न_विचारा ?
सगळी काळा बाजार समजून येईल…….!