त्या सलगड्याचा मृत्यू नेमका कशाने?
रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत सापडले शेतमजुराचे शव
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
राजुरा :-तालुक्यातील केळझर येथील हणमंतु माणकू मडावी वय 47 वर्ष ह्याचा मृतदेह नवेगाव चिंचाळा मार्गावर बेवारस अवस्थेत आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन मृत्यूचे नेमके कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.
प्राप्त माहितीनुसार केळझर येथील रहिवासी हणमंतु मडावी हा मागील 2 – 3 वर्षांपासून विरूर स्टेशन येथील गोहणे ह्यांच्या शेतात सालगडी म्हणून कामावर होता. शिरस्त्याप्रमाणे मांडव अवस (गुढी पाडव्याचा आदला दिवस) झाल्यामुळे शेतमालकाने त्याचा वार्षिक हिशेब करून त्याला ठरलेल्या पगाराचे शिल्लक पैसे दिले. आधीच दारूचे व्यसन असल्याने हनमंतु मिळालेल्या पैशाने सतत दारू पित असल्याची गावात चर्चा आहे.
सवईप्रमाणे तो सायकलने विरुर स्टेशन येथे दारू पिण्यास जात होता. मात्र रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी घरून केव्हा निघुन गेला ह्याची घरच्यांना कुठलीही कल्पना नव्हती. गावातील काही शेतकरी सकाळी शेतावर जाण्यास निघाले असता त्यांना हनमंतु मडावी ह्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडुन असल्याचे आढळुन येताच गावाच्या पोलीस पाटलांना माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी विरूर स्टेशन पोलिसांना घटनेची वर्दी दिली.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेहाची तपासणी केली असता शरीरावर कुठल्याही प्रकारचे व्रण अथवा संशयास्पद असे काहीही आढळुन आले नसून हनमंतु मडावी ह्याचा मृत्यु हृदय विकाराच्या धक्क्याने झाला?, अती मद्य प्राशन केल्यामुळे झाला?, विषारी दारू मुळे झाला? की इतर कुठल्या कारणाने झाला ह्याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच होणार असला तरीही तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असल्याची सूत्रांनी सांगितले आहे.