चंद्रपुरात ओबीसी मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल.

56

चंद्रपुरात ओबीसी मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल.

ओबीसींचे संवैधानिक हक्क, अधिकार मिळण्यासाठी तसेच ओबीसीच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी गुरुवारी ओबीसी बांधवांचा चंद्रपुरात विशाल मोर्चा निघाला. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव चंद्रपुरात दाखल झाले होते. शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी मोर्चेकरी व त्यांच्या पिवळ्या झेंड्यांनी फुलून गेले होते. वेदनात नमूद केल्या प्रमाणे सन २०२१ अंतर्गत जनगणना कार्यक्रम होत आहे.

चंद्रपूर:- कोरोनाचा संसर्ग असताना मोर्चा काढू नका, अशी विनंती प्रशासनाने केली. मात्र, विनंती धुडकावत गुरुवारी चंद्रपुरात ओबीसींचा विशाल मोर्चा निघाला. परवानगी नसताना आपत्तीच्या काळात मोर्चा काढल्यानंतर आता पोलिसांनी ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या आठ सदस्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ओबीसी जनगणना समन्वय समितीचे संयोजक बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदखल, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. फरहान बेग, अन्वरभाई, ॲड. दत्ता हजारे यांच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या मोर्चाची तयारी मागील एक महिन्यापासून सुरू होती. या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. मात्र, देशातील काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. परंतु प्रशासनासमोर खरे आव्हान ओबीसी मोर्चाचे होते.

हजारोंच्या संख्येत लोक एकत्र येणार असल्याने प्रशासनात धडकी भरली. त्यामुळे समन्वय समितीच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बैठक घेतली. मोर्चाला परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे मोर्चा काढू नका, अशी विनंती आयोजकांना केली. मात्र, आयोजकांनी प्रशासनाची मागणी अव्हेरली.

दरम्यान,22 नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले. कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मोर्चा होऊ देऊ नका, असे निर्देश त्यांनी दिले. त्याच रात्री समन्वय समितीच्या सदस्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत पार पडली. आधी ओबीसींची जनगणना करा, असे लेखी आश्‍वासन केंद्रशासनाकडून मिळवून द्या. त्यानंतर मोर्चा मागे घेऊ, अशी भूमिका समन्वय समितीने घेतली. मोर्चा काढणार यावर समन्वय समितीचे सदस्य ठाम राहिले. त्याच रात्री मोर्च्याच्या आयोजकांना पोलिसांनी नोटीस पाठविली.

विनापरवानगीने मोर्चा काढल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू, असा इशारा नोटीसमध्ये दिला. मात्र, मोर्चाचे आयोजक घाबरले नाही. आम्ही कोविडच्या दिशानिर्देशांचे पालन करून मोर्चा काढू, असे प्रशासनाला आश्‍वस्त केले. प्रत्यक्षात मोर्चा निघाला. तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे कोविडचे नियम मोर्चेकऱ्यांकडून पायदळी तुडविले गेले. परिणामी उपरोक्त आठ जणांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.