आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी शोधकार्य करावे
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना मेळावे
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
यवतमाळ :- आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलतेतून समाजोपयोगी कामांमध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या तसेच विविध समस्यांवर उपायोगी ठरतील अशा नाविण्यपुर्ण उत्पादनांचा शोध लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना मेळाव्यात जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आय.टी.आय.) विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रशिक्षण अधिकारी शैलेंद्र गोरडे, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा, रेमंड कंपनीचे कार्यसंचालक नितीनकुमार श्रीवास्तव, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, आय.टी.आय. चे प्राचार्य प्रमोद भंडारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, यवतमाळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी देश पातळीवर पहिले येऊ शकतात एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. अशा बुद्धीमान विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण निर्मितीद्वारे देशाच्या उत्पादनाला हातभार लावला. देशाला कुशल मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी आय.टी.आय. चे महत्वपुर्ण योगदान असून त्यांनी आपल्या चांगल्या कामाची पंरपरा पुढे देखील सुरू ठेवावी. यावेळी देशात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीसोबतच त्यांनी प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी शैलेंद्र गोरडे, नितीनकुमार श्रीवास्तव, विद्या शितोळे यांनीदेखील कौशल्य विकास व रोजगाराच्या संधीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची कामगिरी विषद केली. आजच्या रोजगार मेळाव्यात 21 आस्थापनांनी त्यांच्या 150 रिक्त जागांसाठी भाग घेतला असून त्यासाठी 200 शिकाऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे भंडारे यांनी सांगितले.
यवतमाळ आय.टी.आय. ची विद्यार्थींनी प्रिया दुधे हीने यावर्षी संपुर्ण भारतात मुलींमधून प्रथम क्रमांक मिळविल्याने तीचा व प्रशिक्षक राजेश डोमाळे यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील वर्षी यवतमाळ आय.टी.आय.ला राज्यात सर्वोत्कृष्ट आय.टी.आय.चा पुरस्कार मिळाला. तसेच तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दलही जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन अपर्णा आगरकर यांनी केले.
यावेळी 21 विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, आय.टी.आय. चे प्रशिक्षक अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व शिकाऊ उमेदवार उपस्थित होते.