IPL सट्टेबाजीला विरोध केल्यामुळे, आई आणि बहिणीची केली हत्या.

आयपीएल सट्टेबाजीमध्ये पैसे हरल्यानंतर साईनाथ मोठ्या कर्जात बुडाला. हे कर्ज भरण्यासाठी त्याने बँकेतील 20 लाख रुपये काढले. एवढंच नाही, तर त्याने बँकेत ठेवलेलं 150 ग्रॅम सोन्याचे दागिनेही विकले.

हैदराबाद :- सध्या आयपीएलचा सीजन सुरू होता. यादरम्यान एका तरुणाने आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीमध्ये मोठा पैसा लावला होता. या सट्टेबाजीसाठी त्याच्या आई आणि बहिणीने विरोध केल्याच्या रागात त्याने दोघींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रविवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली.

हैदराबादमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी मेधाचल जिल्ह्यातील रावळकोल गावात राहणारे प्रभाकर रेड्डी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून प्रभाकर रेड्डी यांची पत्नी सुनिता 45, मुलगी अनुषा आणि मुलगा साईनाथ हे तिघेच राहतात. सुनिता एका खासगी कंपनीत नोकरी करतात. साईनाथ रेड्डी एम.टेक शिकत असून तो नोकरीही करतो. तर अनुषा बी.फार्मचं शिक्षण घेते.

प्रभाकर रेड्डी यांच्या निधनानंतर विम्याच्या दाव्याची रक्कम आणि जमीन विक्रीवर मिळालेल्या रकमेसह 20 लाख रुपये बँकेत जमा झाले होते. या आयपीएलच्या सीजनमध्ये साईनाथने आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीमध्ये मोठा पैसा गुंतवला. मात्र सट्टेबाजीमध्ये तो हरला आणि त्याने इतकी मोठी लावलेली रक्कमही गमावली.

आयपीएल सट्टेबाजीमध्ये पैसे हरल्यानंतर साईनाथ मोठ्या कर्जात बुडाला. हे कर्ज भरण्यासाठी त्याने बँकेतील 20 लाख रुपये काढले. एवढंच नाही, तर त्याने बँकेत ठेवलेलं 150 ग्रॅम सोन्याचे दागिनेही विकले. या संपूर्ण प्रकाराची साईनाथच्या आई आणि बहिणीला जराही कल्पना नव्हती.

मात्र, काही दिवसांनी त्या दोघींच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी बँकेतील पैशांबाबत आणि सोन्याबाबत साईनाथकडे विचारणा केली. त्याने खेळलेल्या स्ट्टेबाजीवर दोघींनी आक्षेप घेत, हे सर्व थांबण्याचं सांगितलं.

मात्र याचाच राग आल्याने त्याने 23 नोव्हेंबरला कामावर जाण्यापूर्वी अन्नामध्ये विषारी द्रव्य मिसळलं. साईनाथने जेवणात विष टाकल्याचं दोघींनाही माहित नव्हतं. त्यांनी दुपारी ते जेवण केल्यानंतर, दोघींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. साईनाथच्या आईने लगेचच त्याला फोन करून बोलावून घेतलं आणि त्या दोघींना जेवणातून त्रास झाल्याने, त्याला लंचबॉक्स मधील जेवण न खाण्याचंही सांगितलं.

साईनाथ लगेच घरी आला, पण त्या दोघी बेशुद्ध अवस्थेत जाईपर्यंत साईनाथ दोघींनाही रुग्णालयात घेऊन गेला नाही. अनुषाला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. साईनाथच्या आईचा सुनिता यांचा 27 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. तर अनुषाने 28 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

दोघींच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबिय आणि इतर नातेवाईकांनी साईनाथकडे सर्व प्रकरणाची कबुली दिली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here