केरुनाना लक्ष्मण छत्रे जयंती विशेष: कुणा कुणाचे गुरू होते केरूनाना?

56

प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी केरुनानांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे.

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे
जि. गडचिरोली, मो. नं. ७४१४९८३३३९

विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे हे प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचे ते गुरू होते. चिपळूणकर-आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रांत व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेख आलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते. म्हणून एक नाटक लिहून ते उभे करणार असल्याचे कळल्यावर केरुनानांनी त्यांनी अर्धवट लिहिलेल्या नाटकाचे कागद काढून घेतले व त्यांची फी भरून टाकली.

इ.स.१८५१पासून त्यांच्या बदल्या पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, व्हर्नेक्युलर कॉलेज- ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान त्यांनी इंजीनिअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली. मात्र सन १८६५पासून सेवानिवृत्तीपर्यंत ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही.

मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत.

केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे दि.१६ मे १८२५ रोजी झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्यांकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. गणित, खगोल आणि पदार्थ विज्ञानासारख्या कठीण शास्त्रांत त्यांना पुढे जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिट्युटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो.आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घ्यावी लागते. कारण पुढे त्यांनी अध्यापन कौशल्य दाखवले आणि सरकारदरबारी त्यांनी मानाच्या जागा मिळवल्या.

मीडिया वार्ताचा लेखसंग्रह वाचलात का? क्लिक करा ⬇⬇⬇ 

 

मेजर कँडीच्या मराठीतून शालेय पुस्तके तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तके लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी आदी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयासह प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे. शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत सन १८४८ साली स्थापन झालेल्या ज्ञान प्रसारक सभेच्या व्यासपीठावरून केरोपंतांनी हवा, भरती-ओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध, असे विविध विषयांचे निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते, असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवले आहे.

मुंबईस कुलाब्याच्या दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी इ.स.१८४०मध्ये प्रो.आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या पंधराव्या वर्षी दरमहा पन्नास रुपये पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली दहा वर्षे जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. पुढील आयुष्यात कोणतेही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारत नसत, याचे मूळ या नोकरीत आढळते. केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरण होय. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असे लक्षात आले, की परंपरागत पंचांगात केलेले अशुद्ध गणित व घेतलेल्या ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळे ऋतुकाल तसेच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्यात बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो.टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्याने राजकारणाच्या धकाधकीतही गुरूऋण जाणून व स्वतःस त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढे नेली. केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते. श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृह जीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते.

https://www.instagram.com/p/CdnAxrps7zj/

अशा गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वतः पियानो वाजवण्याचीही आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचे जाणेयेणे होते. नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकाने नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले सौभद्र हे नाटक त्यांना अर्पण केले आहे. विनायक छत्रे ऊर्फ केरुनाना हे थोर व्यासंगी पुरुष दि.१९ मार्च १८८४ रोजी निधन पावले. ते दिवंगत झाल्यावर टाइम्स ऑफ इंडियाने वाहिलेल्या श्रद्धांजलीत, ‘‘जर प्रो.छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते’’ असे म्हटले होते. यावरून त्यांचा मोठेपणा हमखास लक्षात येतोच!
!! पावन जयंतीनिमित्त केरुनानांना विनम्र अभिवादन !!