वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार
🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मूल :
गावालगतच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवार, 16 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णाजवळील जंगलात उघडकीस आली. खुशाल गोविंदा सोनूले (54, रा. भादुर्णा) असे मृतकाचे नाव आहे.कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरिता तेंदूपान गोळा करण्यासाठी खुशाल सोनुले नेहमीप्रमाणे पहाटेच गावापासून काही दूर अंतरावर असलेल्या जंगलात जाऊन घरी परत यायचा असा त्याचा हा नित्यक्रम होता. रविवारी नेहमीप्रमाणे तो जंगलात गेला होता. मात्र, खूप वेळ होऊनही घरी परतला नाही. परिसरात घडत असलेल्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे कुटूंबिय व ग्रामस्थांना शंका आली. लागलीच ग्रामस्थांनी खुशालची माहिती स्थानिक वन कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचार्‍यांनी याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर आणि क्षेत्र सहायक पाकेवार यांना कळविले. वनाधिकार्‍यांनी भादुर्णा गाठले. काही गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शोध घेतला. परंतु, खुशाल सापडला नाही. दरम्यान, अंधार पडू लागल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी शोधकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळपासून पुन्हा वनविभागाचे अधिकारी जी. आर. नायगमकर, पाकेवार, वनरक्षक ऊईके, पारडे, वट्टे आणि काही ग्रामस्थांनी शोधाला सुरूवात केली. तेव्हा मानवी अवयवाचे छीन्न विच्छिन्न तुकडे जंगलात विखुरलेले आढळून आले. सापडलेल्या मानवी अवयवांच्या तुकड्यांवरून खुशालला वाघाने हल्ला करून ठार केल्याचे निष्पन्न झाले. वाघाच्या हल्ल्यात खुशाल मृत पावल्याची माहिती मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांना देण्यात आली. पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि छिन्न विच्छिन्न झालेला खुशालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. वनविभागाच्या वतीने नायगमकर यांनी मृतकाच्या नातेवाईकास तात्काळ 25 हजार रुपये आर्थिक मदत दिली. यावेळी क्षेत्र सहायक पाकेवार, माजी सरपंच संतोष रेगुंडवार, वनरक्षक यांच्यासह काही ग्रामस्थ उपस्थित होते. =============