अबोली महिलांना दिलेले थांबे खाली करुन द्या अन्यथा आंदोलन
संतोष आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509
पनवेल : – डी मार्ट येथील अबोली महिला रिक्षा संघटनेच्या महिला रिक्षा चालकाला पुरुष रिक्षाचालकाने बेदम मारहाण केल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रिक्षा चालकावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या हल्ल्यामुळे महिलांना अधिकृतपणे दिलेल्या रिक्षा थांब्यांवर पुरुष रिक्षा चालकांना रिक्षा लावण्यास मज्जाव करावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. व असे न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी दिला आहे.
महिलांना सक्षम करण्यासाठी अबोली महिला रिक्षा ही संकल्पना पुढे आली. यामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संतोष भगत यांनी अबोली महिलांना एकत्र आणून त्यांचे न्यायहक्क त्यांना मिळवून देण्यासाठी अबोली महिला रिक्षा संघटनेची 2018 रोजी स्थापना केली. संघटना स्थापन केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी अबोली महिला रिक्षा संघटनेतील सदस्य महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. तसेच महिलांना व्यवसाय करण्यास सोपे जावे म्हणून अबोली महिला रिक्षांसाठी अधिकृत स्वतंत्र थांबे मिळवून दिले. परंतु या थांब्यांवर पुरुष रिक्षा चालक नेहमीच महिला रिक्षा चालकांना त्रास देत आहेत. महिलांना मारहाण करतानाही हे रिक्षा चालक मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे महिलांसाठी अधिकृत असलेले थांबे महिलांसाठीच उपलब्ध करुन द्यावेत अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत यांनी दिला आहे.
या महिलांसाठी असलेल्या अधिकृत थांब्यावर पुरुष रिक्षाचालक रिक्षा लावतात तसेच दादागिरीही करतात. महिलांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत झालेले असून सुध्दा पोलीस ठाण्यात केवळ एनसी नोंद केली जाते त्यामुळे या रिक्षा चालकांना कसलीच भिती उरलेली नाही.
आरटीओ व पनवेल महानगरपालिकेतर्फे नवीन पनवेल डीमार्ट, आदई सर्कल, नवीन पनवेल रेल्वे स्थानक, बस स्टॅण्डच्या मागे या ठिकाणी अबोली महिलांसाठी रिक्षा थांबे देण्यात आलेले आहेत. या सर्वच थांब्यांवर पुरुष रिक्षा चालक रिक्षा लावतात. त्यामुळे अनेकवेळ वादाचे प्रसंग घडून येतात.
महिलांसाठी असलेल्या बसथांब्यांवर अनेक वेळा पुरुष रिक्षाचालकांनी महिलांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केल्या आहेत. डोंबिवली, कर्जत, मानखुर्द, कल्याण, नेरुळ अशा अनेक ठिकाणी महिलांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु पोलीस ठाण्यात केवळ एन सी नोंद करुन पुरुष रिक्षा चालकास बोलवून समज देवून सोडले जाते. त्यामुळे रिक्षा चालकांचे मनोधैर्य वाढले आहे. महिलेस मारहाण करुनही जर त्यांना शिक्षा होवू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे महिलांना कायद्याने विशेष संरक्षण दिलेले असताना अनेक ठिकाणी महिलांना मारहाण होवून सुध्दा मारहाण करणारे मोकाट फिरत असतील तर महिलांना कायद्याने दिलेल्या विशेष संरक्षणाचा फायद काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
———
अबोली महिला रिक्षा चालकांसाठी दिलेल्या अधिकृत थांब्यांवर अनेक पुरष रिक्षा चालक व्यवसाय करतात. त्याला आम्ही कधीच आक्षेप घेतला नाही. परंतु महिलांनी येथे रिक्षा न लावण्यासाठी त्यांना दमदाटी व मारहाण होत असेल तर हे सर्व रिक्षा थांब्यांवर एकाही पुरष रिक्षा चालकाला रिक्षा लावून देणार नाही.
ः संतोष भगत
संस्थापक, अध्यक्ष
अबोली महिला रिक्षा
संघटना महाराष्ट्र राज्य