वाघाच्या हल्ल्यात ईसम ठार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
ब्रम्हपुरी-नागभिड मार्गावरील तुमडी – मेंढा गावाजवळील सायगाटा जंगल परिसरात वाघाने हल्ला करून एका वठार केले. ही घटना बुधवार, 29 जून रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद चंदनखेडे (रा. भगवानपूर) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भगवानपूर येथील ताराचंद चंदनखेडे हे ट्रॅक्टरकरिता डिझेल आणण्यासाठी ब्रम्हपुरी येथे जात होते. यावेळी पोद्दार शाळेजवळ आपले वाहन ठेवून प्रात:विधीसाठी लगतच्या जंगल परिसरात गेले होते. त्यानंतर ते पाण्याचा शोधात 25 ते 30 मीटर आत जंगलात गेले असता वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. दरम्यान, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळताच त्यांच्या चमूने घटनास्थळी पोहचून चौकशी केली व मृतदेह विच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आला.सायगाटा जंगलात वाघ व दोन बछड्यांनी बस्तान ठोकले असून ते कऱ्हाडच्या जंगलातून या परिसरात आल्याचे समजते. 2-3 दिवसांपूर्वी चांदगाव मार्गावरील गोसेखुर्द कालवाच्या पालव पूलावर वाघ असल्याची चित्रफीत व्हायरल झाली होती. हा वाघ चांदगाव जंगल परिसरातील असल्याचे सांगितल्या जात आहे. या शिवाय गोसेखुर्द धरण कालव्याच्या पाळीलगत खरबी माहेर गावाजवळील वाघीण, बछडे वेगळेच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान तालुक्याच्या टोकावरील हळदा परिसरात वाघाची दहशत अद्यापही कायम आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी नुकतेच उपवनसंरक्षक कार्यालयासमोर निदर्शने केली होती. वनविभागाने त्वरित दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.