राजकारणातील बुद्धिबळ …

राजकारणातील बुद्धिबळ …

राजकारणातील बुद्धिबळ ...

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : -राजकारणातला पहिला धडा असतो तो हा, की कारणाशिवाय काहीही घडत नाही. प्रत्येक गोष्ट ही कार्यकारण भावानेच घडत असते….नव्हे ती घडवून आणली जाते!

माणूस राजकारणात ज्या क्षणी उतरतो त्या क्षणी त्या च्या समोर एक भला मोठा बुद्धिबळ-पट उलगडतो. तिथून पुढे प्रत्येक पाऊल एक ‘खेळी’ असते. ती अपरिहार्य आहे. तिला रंग कोणताही द्या …. शेवटी खेळीच.
शिंदे- फडणवीस युती ही तशीच. ठाकरेंचा राजीनामाही तसाच. ठाकरे वा फडणवीसांनी फार मोठा त्याग केला आहे हा अगदी बालिश विचार झाला. सध्या उघडपणे किंगमेकर च्या भूमिकेत असलेले फडणवीस जेव्हा अनपेक्षितपणे दुय्यम , उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात तेव्हाही तो त्याग वगैरे नसतो. ते पद का स्वीकारले याचे उत्तर नंतर कधीतरी मिळते. जे स्वत: बुद्धिबळ खेळतात त्यांना हे समजतं की एकाच चालीत शह आणि मात देता येत नाही. काही वेळा चार घरे मागे यावेच लागते. दम धरावा लागतो. हा बिनडोकांचा प्रांत नाही. फडणवीस बिनडोक नक्कीच नाहीत.
ठाकरेंनी जाता जाता मारून ठेवलेल्या खुट्ट्या त्यांना व्यवस्थित समजतात. आपली ‘बामण’ जात या पुरोगामी महाराष्ट्रात कशी आडवी येते हे ही ते जाणतात. अगदी काल रात्रीपर्यंत थंड्या बस्त्यात असलेले ( ठेवलेले) काही मुद्दे अचानक कसे उफाळून येतील याचा नीट अंदाज त्यांना आहे… मोदींना तर आहेच. अशा विखारी दंशाला प्रबोधनाचा मिळमिळीत उतारा काही कामाचा नाही. इतका भोळसटपणा आता कोणालाच परवडत नाही.
मॅनेज केलेल्या मीडियातून गदारोळ करणे एक स्वतंत्र विषय आहे. पट्टीचा खेळाडू केव्हाही आजूबाजूच्या कोलाहलाकडे लक्ष न देता आपली प्यादी सरकवतो. सध्या मराठी पत्रकारोत्तमांना सगळ्यात मोठा धक्का हा आहे की त्यांना भावी घटनांचा जराही अंदाज आला नाही.. ते मठ्ठ ठरले! ‘आपण फारच चाणाक्ष’ हा भ्रम दूर होणे भलते त्रासदायक असते. तोच त्रास सध्या मीडियावाले भोगताहेत.
जे झाले ते फडणवीसांनाच हवे होते, हे एक टोक आहे; आणि फडणवीसांचे ‘पंख छाटले’ वगैरे हे दुसरे टोक आहे. असं छापणारे, लिहिणारे, बोलणारे फक्त करमणूक करतात. राजकारणात एखादी व्यक्ती मनाविरुद्ध वागायला तयार होते ते ही कधी विनाकारण नसते. जो पटावर बसतो, त्यालाच पुढच्या चार चाली दिसत असतात. बाजूला बसून बघणारे उगाच स्वत:ला चाणक्य वगैरे समजतात.
तेव्हा, सुजनहो .. फडणवीसांना उगा ‘त्यागमूर्ती’ बनवू नका; नवा खलनायकही बनवू नका ( अणाजीपंत?) किंवा ‘पीडित – अन्यायग्रस्त’ ठरवून सहानुभूतीमधे बुचकाळून काढू नका. ते इतर सगळ्यांप्रमाणे राजकारणी आहेत. इतर जवळ जवळ सगळ्यांपेक्षा सरस राजकारणी आहेत. हे त्यांनी आता सिद्ध करून दाखवलंय.
आपण त्यांना सल्ले दिले नाहीत तरी चालण्यासारखं आहे!