सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्याकडून ग्रंथालयासाठी 100 हून अधिक नवीन पुस्तके भेट
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. 8149734385
जोगेश्वरी :- जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक श्री. गणेश हिरवे यांनी नुकतीच गोवंडी येथील मनपा माध्यमिक शाळेसाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील शंभरहून अधिक पुस्तके व मासिक भेट स्वरूपात दिली.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात दिवसेंदिवस वाचन कमी होत आहे व प्रत्यक्षात पुस्तक हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. अशावेळी गोवंडीतील मनपा शाळेने नव्यानेच उघडलेल्या लायब्ररीसाठी मोहम्मद अस्लम सर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना ही पुस्तके विनामूल्य भेट देण्यात आली. सध्या मोबाईलवरील गेम्स, मिम्स व इतर अनेक गोष्टींकडे तरुणांचे अधिक लक्ष असते, त्यामानाने त्यांच्याकडून इतर अनेक चांगले संदेश स्किप केले जातात. पुस्तके आपल्या जीवनात दिपगृहाचे काम करतात. पुस्तकांसारखा सोबती मित्र नाही. तसेच लेखन व वाचन यांसारखे चांगले छंद नाहीत असे हिरवे सर आवर्जून सांगतात.
मागील वीस बावीस वर्षात सरांनी तेरा हजाराहून अधिक पुस्तके अनेक संस्था, शाळा, ग्रंथालये यांना विनामूल्य दिलेली आहेत. अनेकवेळा शुभप्रसंगी काय भेट देता येईल असा प्रश्न आपल्यासमोर असतो, तेव्हा भेटवस्तू बरोबरच एखादं छानसं पुस्तक आपण नक्कीच भेट देऊ शकतो यावर यावर हिरवे सर जोर देतात. हिरवे सर स्वतः वैयक्तिकपणे सर्वांना सहकार्य करतातच पण त्यांच्या जॉय ऑफ गिविंग संस्थेच्यावतीनेही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. लॉकडाऊन काळातही हिरवे सर व त्यांच्या जॉय संस्थेने अनेकांना भरीव सहकार्य केलं आणि आजही त्यांचं हे कार्य असेच सुरु आहे.