सलग सहाव्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग

सलग सहाव्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग

सलग सहाव्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

*शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान
*ईरइ धरणाचे तीन दरवाजे उघडले
*बल्लारपूर तालुक्यात अनेक घरांची पडझड
*कोरपना-आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग पुन्हा बंद

चंद्रपूर, : – 12 जुलैजिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्व नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. नलेश्वर, चंदई, चारगाव धरण, लभानसराड, डोंगरगाव ही पाच जलाशये 100 टक्के भरली आहेत. इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, सततच्या पर्जन्यमानामुळे तिन्ही दरवाजांची सुरूवात 25 सेंटीमिटरने वाढवण्यात आली आहे. कोरपना-आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे पुन्हा बंद झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचून पिकाचे नुकसान झाले आहे. सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याच्या जवळपास पर्जन्यमान झाले आहे. या पावसामुळे बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील 50 च्यावर घरांची पडझड झाली असून, अनेकांचा निवारा हिरावला गेला आहे. यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने विविध वार्डात 10 घरांची पडझड झाली. ग्रामीण भागात विसापूर येथे 10 कुटुंबाच्या घरांची पडझड झाली आहे. यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. बामणी (दुधोली) येथे 2, चारवट येथे 5, नांदगाव (पोडे) 5, कोठारी येथे 10, मानोरा येथे 3, इटोली येथे 2 तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत 3 जणांची घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे.
इरई धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होत असल्याने प्रशासनाने चंद्रपुरकरानां सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे इरई नदीच्या आसपास राहणार्‍या लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. घुग्घुस येथे सकाळी काही वेळ मुसळधार, तर दिवसभर रिपरिप पाऊस सुरू होता. रविवारपासून बंद असलेल्या धानोरा-गडचांदूर महामार्गावरील पुराचे पाणी ओसरल्याने हा मार्ग सुरळीत सुरू झाला आहे.
वरोरा तालुक्यातील चारगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भद्रावती, चिमूर, नागभीड, मूल, कोरपना येथे सकाळी काही वेळ मुसळधार व रिपरिप पाऊस सुरू होता. तर, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, सावली येथे दिवसभर रिपरिप स्वरूपाचा पाऊस सुरू होता. कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे कोरपना तालुक्यातील शेतातील पिकांची बिकट अवस्था झाली असून, शेतात पाणी साचून तूर, सोयाबीन, कापूस पिके पाण्याखाली गेली आहेत. सिंदेवाही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सतत पाऊस सुरू असून, शेतकर्‍यांनी रोवणीची कामे लगबगीने सुरू केली. मात्र, कामाला मजुरांची कमतरता भासत आहे. मूल तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी अनेक घरांची पडझड होऊन लोकांना आर्थिक फटका बसला आहे. सतत पावसामुळे वैनगंगा नदीची पातळी वाढल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास ग्रामीण भागातील काही रस्ते बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
===============