चंद्रपूर भंडारा साकोली चोरी, अट्टल चोरट्ट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

भंडारा / चंद्रपूर :- चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील घरफोडीच्या घटनांसह भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दुर्गापूर येथून दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पाच गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अमोल आदेश इलमकर वय 20, रा. दुर्गापूर आणि ज्ञानेश्‍वर गुलाब बोरकर वय 23, रा. मेजरगेट अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.

शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जोडदेऊळ पठाणपुरा मार्गावरील एका घरी 17 नोव्हेंबरला चोरीची घटना घडली. यात सोने, चांदीचे दागिने व रोख असा एकूण 58 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तसेच दिशा अपार्टमेंटमध्येसुद्धा 15 नोव्हेंबरला अशीच घटना घडली होती. यात पोलिसांनी सुमारे दहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच घुग्घुस ठाण्यातील शातकराम परिसरातून 10 मार्चला चोरट्यांनी 68 हजारांचा मुद्देमाल, रामनगर हद्दीतील चांदमारी परिसरातून 23 ऑक्‍टोबरला 38 हजारांची चोरी केली होती. या सर्व प्रकरणांचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दुर्गापूर परिसरात दोन संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अमोल इलमकर, ज्ञानेश्‍वर बोरकर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी चोरट्यांनी वरील चारही गुन्ह्यांसोबत भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.यावेळी चोरट्यांकडून सोन्याचा झुमका, गोफ, चांदीचा ग्लास, कटोरी, निरंजनी, नंदादीप, रिंग, रोख 7 हजार रुपये, चांदीचे चाळ, मंगळसूत्र, चांदीचा त्रिशूल, लक्ष्मी, गणपतीची मूर्ती असा एकूण 68 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, चंदू नागरे, अविनाश दाखमवार, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here