कोकण रेल्वे नी रायगड मधील वीर स्थानकापासून लोकल रेल्वे सुरु करावी अशी सर्व सामान्य जनतेची मागणी
✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०२📞
माणगांव :-रायगडचे सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व निकम्मे.रायगडमधुन कोकण रेल्वेमार्ग जातो. या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केंद्र शासनाने पुर्ण केले आहे. या मार्गावरून महिना केवळ ४०० ते ५००/- रूपयांचा पास काढुन रायगड वासी पनवेल, नवीमुंबई येथे रोजगार व उच्च शिक्षणासाठी रोज येजा करू शकतात. परंतु कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दक्षिण रायगडमधील रोहा व वीर येथुन पनवेल मध्ये येजा करायला एकही ट्रेन सध्या उपलब्ध नाही. यामुळे अनेक जण दररोज २५०/- रूपये खर्च करून मिळेल त्या वाहनाने फुटलेल्या हायवे वरून हाडे मोडत अपडाऊन करत आहेत. केवळ प्रवासासाठी ५०००/- रुपये मासिक खर्च होत असल्याने दक्षिण रायगडमधील तरूण पनवेलमधील १० ते १५०००/- मासिक पगाराच्या नोकऱ्या करण्यास इच्छुक नाहीत कारण येवढा त्रास करूनही रोज प्रवास खर्च वगळता त्यांच्या हातात फक्त ५-७०००/- रूपये महीना राहणार आहेत. रायगडच्या जनतेने रेल्वेला जमिनी दिल्या आणि दक्षिण व उत्तरेत जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या केवळ पहात राहणे आमच्या नशिबी आले.
रायगडच्या आमदार खासदारांनी कधी याबाबत खडसावुन रेल्वेला बजावले नाही. दक्षिण रायगड वासियांसाठी रोहा व वीर येथुन ऑफिस टाइम्समध्ये प्रत्येकी एक ट्रेन सुरू करा अन्यथा लांब पल्ल्याची एकही ट्रेन येथुन धावु देणार नाही असे ठणकावण्याची धमक रायगडच्या एकाही नेत्याकडे नाही. या वेळेत ट्रेन सुरु झाल्यास रायगडमधील शेकडो तरुण तरुणी नवी मुंबईत नोकरी करू शकणार आहेत पण याचे भान या नेत्यांना नाही. रेल्वे डबलट्रॅक ,स्टेशन तयार आहेत आणि विशेष म्हणजे सकाळी व सायंकाळी या मार्गावर तेवढी एक्सप्रेसची वर्दळही नाही तरीही आमच्या नेत्यांना ताणुन मागणी करता येत नाही कारण जनतेचे यांना सोयरसुतक नाही.
रायगड मधुन जाणारा मुंबई गोवा महामार्ग यापुर्वीच तब्बल 12 वर्षे रखडलाय. एप्रिल 2022 मध्ये मा. खासदार तटकरेंच्या उपस्थितीत मा. केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी याच मार्गाच्या नव्याने कॉंक्रिटीकरणाचे भुमिपुजन केले.केंद्र सरकारकडून 400कोटींचा निधीदेखील मंजुर केल्याचे जाहीर केले. परंतु अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. निधी मंजूर होऊनही काम का सुरू होत नाही याचे स्पष्टीकरण अद्याप कुठल्याही आमदार वा खासदारांनी दिलेले नाही. रायगडातील एकाही पत्रकाराने असा प्रश्न या नेत्यांना विचारलेला नाही. भुसंपादन अथवा वन खात्याची परवानगी वा कोर्ट केसेस यापैकी कशाने काम अडले असेल तर ते कारण शोधणे व अडचणीचे तातडीने निराकरण करणे हे यांचे काम नाही का? हे नेते फक्त सरकारी पेन्शन खायला आणि निधी लाटायला आमदार,खासदार झालेत का असा अनेकदा प्रश्न पडतो.
या वर्षी राज्य सरकारच्या बजेटमध्ये सागरी महामार्गासाठी ५०० कोटी निधी मंजुर झाला असे समजले परंतु एवढ्या महिन्यात कुठे एक इंच सुद्धा भुसंपादन कार्यवाही झालेली नाही. साधे भुसंपादन होत नाही मग महामार्ग करणार कधी?
रायगड रत्नागिरी ला जोडणारा बाणकोट खाडी पुल पुर्ण करायला निधी आला परंतु त्याचे कोणतेही काम सध्या सुरू नाही. सर्वच कामे दिर्घकाळ लटकतात यांची जबाबदारी नक्की कोणाची?
तटकरेंना हे सर्व समजतंय पण त्यांनी मतदारांना गृहित धरलेले दिसतेय. अनंत गीतेंनी तरी वीर व रोह्यातुन कामकाजाच्या वेळेत ट्रेन सुरू करून दाखवली तर रायगडमधील हजारो तरुणांना नवी मुंबईत रोजगार व शिक्षणाची दालने खुली झाल्याने व्यापक जनाधार मिळु शकणार आहे पण त्यांना यातली संधी लक्षात येत नाही आहे. भाजप,कॉंग्रेस व शेकापक्षा कडे दक्षिण रायगडमध्ये खंबीर व खमक्या नेतृत्वाचीच उणिव आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी सांगताहेत कधी कुणाला गृहीत धरू नका. इमाने इतबारे विकास केला तरच अडचणीच्या काळात जनाधार उभा राहतो नाहितर खितपत पडुन रहावे लागते. आज नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे जनता खितपत पडली आहे वेळीच जबाबदारीने वागा नाहितर तुम्ही नेते सुध्दा एकदिवस खितपत पडाल.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची कर्मभुमी व अखंड हिंदुस्थानात मराठेशाहीचा झेंडा रोवणा-या पेशव्यांच्या जन्मभुमीत कामचोर, निकम्मे नेते आमदार खासदार बनलेत का? असा प्रश्न रायगडच्या जनतेला पडलाय.
रायगडध्ये असणारे नेते खडबडून जागे झाले पाहिजे. आज जनतेचे काम झाले नाही तर आम्ही जनता दुसऱ्या कोणालाही मत देऊ पण तुम्हाला आमदार खासदार बनवणार नाही हे यांना कळूद्यात. कुठलाच पर्याय मिळाला नाही तर नोटा आहेच पण काम केले नाहीत तर पुन्हा तुम्ही नाही हे नेत्यांना कळुदे असे सर्व जन सामान्य जनतेचे म्हणणे आहे.