भाड्याचे घर सोडले म्हणून युवकाने केला खून
✍ त्रिशा राऊत ✍ नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
नागपूर : मुलीची छेड काढत असल्याने काळजीपोटी वडिलांनी भाड्याचे घर सोडले. याचा राग मनात ठेवत २० वर्षीय माथेफिरूने मुलीच्या वडिलावर भररस्त्यात चाकूने सपासप वार केले.या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर घडली. आरोपीला अटक केली आहे.
बलराम मनोज पांडे (वय २०. रा. सुरेंद्रगड) असे आरोपीचे तर नारायणप्रसाद दयाप्रसाद द्विवेदी (वय ३२ रा. सुरेद्रगड) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणप्रसाद यांचे रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. सुरेंद्रगड या परिसरात ते आपल्या परिवारासह भाड्याने वास्तव्यास राहायचे. त्यांना १५ वर्षाची मुलगी आहे. ते राहत असलेल्या इमारतीमध्ये बलराम मनोज पांडे राहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बलराम त्यांच्या मुलीच्या मागे लागला होता. शाळेत जात असताना तो सातत्याने तिचा पाठलागही करायचा. ही बाब नारायणप्रसाद यांना कळली. त्यांनी याबाबत त्याला समजविण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही तो तिचा भाड्याचे घर सोडले म्हणून युवकाने केला खून पाठलाग करीत होता.
त्यामुळे त्यांनी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर घर सोडल्यास खून करण्याचीही धमकी दिली होती. मात्र, त्याला न जुमानता त्यांनी घर सोडले. त्यामुळे बलराम भडकला होता. रविवारी सकाळी नारायणप्रसाद हे आपल्या वाहनावर घरापासून रेल्वेस्टेशनकडे जायला निघाले असताना बलरामने त्यांचा पाठलाग केला. पोलिस स्टेशनच्या काहीच अंतरावर त्यांना थांबवून त्यांचेशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने बलरामने नारायणप्रसाद यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले आणि पळून गेला. घटनेची माहिती पोलिस घटनास्थळी आले आणि जखमी नारायणप्रसाद याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित बलरामला काही वेळातच अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नारायणप्रसाद यांच्या खुनानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असल्याची माहिती आहे. त्यातून गिट्टीखदान पोलिस ठाण्याला परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाइकांनी घेराव घातला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कागदपत्रे रुग्णालयाला न मिळाल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करता आली नाही. त्यामुळे नागरिकांना मृतदेह अद्याप मिळाला नसल्यानेही नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. बलराम पोलिस ठाण्यात असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी पोलिस ठाणे गाठून नागरिकांशी संवाद साधला.