न्यायप्रविष्ठ प्रकरण असूनही नुकसान भरपाई बाबतचा धनादेश तहसिलदारांनी अदा केला
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी आमरण उपोषणाचा इशारा
✍🏻किरण बाथम✍🏻
रोहा तालुका प्रतिनिधी
📞7020541776📞
रोहा : – सामायिक शेतीच्या नुकसान भरपाईचा धनादेश मर्यादित व्यक्तींना दिला गेला.विशेष म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शेतकरी वारसानी लेखी तक्रार दिली तरीही तहसीलदारांनी मोजक्याच लोकांना धनादेश दिला. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट ध्वज वंदनापूर्वी आमरण उपोषण करण्याचा इशारा वारसानी दिल्याने खळबळ माजली आहे.
रोहा तालुक्यातील तारेघर येथील गट/भूमापन क्र. २०४ संदर्भात न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे. प्रकरण प्रलंबित असल्यामुळे सामाईक शेतीच्या नुकसान भरपाई बाबतचा धनादेश देऊ नये असे पत्र देण्यात आले होते. मात्र लेखी हरकत घेऊनही तहसिलदार कविता जाधव यांनी धनादेश अदा केल्याची तक्रार खारापटी येथील सचिन नामदेव चोरगे यांनी दाखल केली आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे.त्यामुळे आपल्याला १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी न्याय न मिळाल्यास रोहा तहसिल कार्यालयासमोर सहकुटूंब आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सचिन चोरघे यांनी महसूल मंत्री – महाराष्ट्र राज्य, तसेच संबंधित शासकीय कार्यालयांना लेखी निवेदनातून दिला आहे.
रोहा तालुक्यातील तारेघर येथे गट/भूमापन क्र. २०४ ही सचिन नामदेव चोरगे यांची वडिलोपार्जित सामायिक जमीन असून वजिलांच्या मृत्यू नंतर या जमीनीचे एकूण सात वारस अनुक्रमे १) निर्मला नामदेव चोरगे, २) मंगेश नामदेव चोरगे, ३) जगदीश ना. चोरगे, ४) वसंत नामदेव चोरगे, ५) सचिन नामदेव चोरगे, ६) संतोष नामदेव चोरगे, ७) सरोज नामदेव चोरगे उर्फ रसिका राजेश भोय हे सर्व आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अपील क्र. २५५/२०२१ नुसार सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ व प्रलंबित आहे. असे असताना देखील या जमीनीमध्ये रोहा येथील कंपन्यांद्वारे सोडण्यात आलेल्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे सर्व शेती नापीक झाली आहे. त्याबाबतची नुकसानभरपाई ही सर्व वारसांना मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु सदरच्या नुकसान भरपाईचे धनादेश फक्त प्रमिला प्रदीप चोरगे आणि विभा वैभव चोरगे या दोघींच्या नावानेच देण्यात आले.
याबाबत सचिन चोरगे यांनी रोहा तहसिलदार कविता जाधव यांना सदर धनादेश प्रमिला प्रदीप चोरने व विभा वैभव चोरगे यांस अदा करू नये असे लेखी स्वरूपात हरकत पत्र दिले होते. तहसिलदार रोहा यांनी हे सर्व प्रकरण संपूर्ण माहीती असूनही जाणून बुजून तो धनादेश श्रीमती प्रमिला प्रदीप चोरगे व श्रीमती विभा वैभव चोरगे यांना देऊन आम्हा सर्व वारसांवर अन्याय केला आहे. असा आरोप सचिन चोरघे यांनी केला आहे. या सगळ्याचा आमच्या कुटूंबावर आर्थिक व मानसिक परिणाम झाला आहे. तरी प्रमिला प्रदीप चोरगे व विभा वैभव चोरगे यांना देण्यांत आलेली १५,७५,०३०/- ही नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी व आम्हा वारसांना सम प्रमाणात वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कविता जाधव तहसिलदार-रोहा यानी अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यांत यावी. अन्यथा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी आम्हांला न्याय मिळला नाही तर रोहा तहसिल कार्यालया समोर सहकुटूंब आमरण उपोषणास बसून अहिंसात्मक मार्गाने आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा सचिन चोरगे यांनी दाखल केलेल्या निवेदनातून दिला आहे.