पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे आवाहन  

46

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे आवाहन

विशाल सुरवडे 

जळगाव ब्युरो चीफ

 मो: 9595329191

जळगाव, दि.25 – जळगाव जिल्हयात रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे. मात्र बैलांचे लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे, त्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा न करता बैलांची पूजा गोठ्यातच करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जळगाव जिल्हयातील सर्व पशुपालकांनी गाई, म्हशींमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसुन आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्कीन आजार संसर्गजन्य असला तरी रोगाचे निदान लवकर झाल्यास व लवकर योग्य उपचार सुरु केल्यास ८ ते १० दिवसात तो बरा होतो. तसेच जळगाव जिल्ह्यात उपचाराअंती रोग बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता शासकीय यंत्रणेमार्फत उपचार करुन घ्यावे. त्यासोबतच गोठा स्वच्छता व गोचीड निमुर्लन पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या सहकार्याने करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.