तरूण शेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
पोंभुर्णा, 30 ऑगस्ट
तालुक्यात आलेल्या संततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेले. बँकेतून कर्ज घेऊन शेती करणार्या सोनापूर येथील तरूण शेतकर्याने हातचे पिक गेल्याने हताश होऊन टोकाचे पाऊल उचलत स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, 29 ऑगस्टला उघडकीस आली. ज्ञानेश्वर वामन गौरकार (32) असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे. पोंभुर्णा तालुक्यात संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. हिरवीगार पिके कुजून गेली. कर्ज काढून उभी केलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने व बँकेचे थकित कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून सोनापूर येथील तरूण शेतकर्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तो रविवारपासून बेपत्ता होता. तो घरी आला नसल्याने शोधाशोध केली असता सोमवारला त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जाेशी यांचे मार्गदर्शनात पोलिस अंमलदार राजकुमार चौधरी करीत आहे.
त्याच्या पश्चात आई ,वडिल, पत्नी,मुलगा,मुलगी असा आप्त परिवार आहे.