विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच राष्ट्रीय महामार्गांचे काम रखडले; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप

54

विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच राष्ट्रीय महामार्गांचे काम रखडले; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप

नंदलाल एस. कन्नाके

गडचिरोली जिल्हा (विशेष) प्रतिनिधी

मो.नं. 7743989806

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांसह छत्तीसगड, तेलंगाणाला जोडणाऱ्या आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी टप्पेनिहाय निधी उपलब्ध आहे; परंतु महामार्ग प्राधिकरण, वनविभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळेच हे काम रखडलेले असून, त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे, असा आरोप आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

४० ते ५० वर्षांपूर्वी तयार झालेल्या त्या मार्गाची त्यावेळची क्षमता १० टन भारवाहनाची होती; पण आज सुरजागड लोहखाणीसह सर्वच प्रकारची जड वाहतूक छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून होते. त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी करून योग्य क्षमतेचा मार्ग बनविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

दि. १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आता ८ ऑक्टोबरपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये परिवार संवाद यात्रा काढत असून, त्याची सुरुवात सिरोंचा येथून केली जाणार असल्याची माहिती धर्मरावबाबा यांनी यावेळी दिली.

आलापल्ली बायपाससाठी सर्वेक्षण झाले

आलापल्ली येथे लवकरात लवकर बायपास मार्ग तयार करून सुरजागड लोहखनिजाची वाहतूक त्या मार्गाने वळवावी. सर्व प्रकारच्या ओव्हरलोड परिवहन विभागाने ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी यावेळी धर्मरावबाबा यांनी केली.

जिल्ह्याच्या उत्तर भागात वाघाचे अलीकडे २६ बळी झाले. त्यातील २४ लोकांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. विजेची समस्याही वाढली आहे. नक्षलग्रस्त भागात भारनियमन करता येत नसताना महावितरणची मनमानी सुरू आहे; पण या भागातील लोकप्रतिनिधी गावात येतच नसल्याची खंत नागरिकांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचे ते म्हणाले.