चंद्रपुरात चोरट्यांचा आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद

55

चंद्रपुरात चोरट्यांचा आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले, दोन महिलांसह 6 आरोपींना अटक  

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

विविध राज्यातील शहरामधील बँक व सराफा दूकानावर लक्ष ठेवून तेथे येणार्‍या नागरिकांचे लक्ष विचलित करित त्यांच्याजवळील मोठी रक्कम लंपास करणार्‍या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पदार्फाश करण्यात रामनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या कारवाईत 2 महिलांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

येथील बाबुपेठ वॉर्ड परिसरातील मोनीश शिवकुमार बघेल यांनी 20 मे 2022 रोजी सिध्दार्थ हॉटेलच्या बाजुला असलेल्या एसबीआय बँकसमोर आपली कार उभी केली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तेथे येऊन त्यांच्या कारमधील चालकाला तुमच्या कारचे ऑईल गळत असल्याचे सांगितले. त्यामुळे बघेल व त्यांचा चालक कारमधून खाली उतरुन कारच्या इंजनची पाहणी करु लागले. यावेळी यातील दोन अज्ञात व्यक्ती संधीचा फायदा घेऊन कारमधील 11 लाख 10 हजार रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन फरार झाले. याबाबतच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.

आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले. तसेच घटनास्थळावरील फुटेज व सायबर सेलच्या तांत्रिक बाबीवरून अज्ञात आरोपींची माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानंतर या आरोपींचा गुन्हे शोध पथकाने तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक (यादगीर), सोलापुर (पंढरपूर) पर्यंत पाठलाग केला. तपासादरम्यान आरोपी पी. एच. बाबु शंकररैया छल्ला (30), रमेश छल्ला (28), येल्लीया सन्नी छल्ला (30), नानी नागेशराव येरगदीमल्ला (18), कल्पना किशोर कुन्चाला (37), बाबु गोगुल्ला (27, सर्व रा. कपराल्ला तिप्पा, पोस्ट धामवरम, ता. बोगोले, जिल्हा नेल्लोर, राज्य आंध्रप्रदेश) या आरोपींना चंद्रपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. आरोपींकडून 10 हजार रुपये रोख, 1 लाख रुपये किंमतीच्या दोन दूचाकी, 3 हजार रुपये किंमतीचे भ्रमणध्वनी व 22 वेगवेळ्या कंपनीचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींनी यापूर्वी महाराष्ट्रातील मुलुळ, भांडूक, पनवेल, अमरावती, वरोडा तसेच चंद्रपूर यासह इतर राज्यात सुध्दा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

अशाप्रकारे नागरिकांना लुटत होते चोरटे 

आरोपी ज्या शहरामध्ये गुन्हा करायचा आहे त्या शहरात अगोदरच येऊन खोली भाडयाने करून राहत होते. अंदाजे 15 ते 20 दिवस शहरामधील बँका तसेच सराफ दुकानावर नजर ठेवून तेथे ये-जा करणार्‍यांचा ते अभ्यास करीत होते. त्यानंतर बँकेमधून पैसे काढून चारचाकी व दुचाकी वाहनाने जाणार्‍या लोकांच्या वाहनाखाली ऑईल टाकून, अंगावर थुंकुन, घाण टाकून किंवा वाहनाचे टायर पंक्चर आहे, असे बतावणी करून त्यांचे लक्ष विचलित करीत होते. त्यानंतर त्यांच्या वाहनातून पैसे घेऊन पसार होत होते.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलिस निरीक्षक हर्शल ओकरे, पोलिस उपनिरिक्षक विनोद भुरले, हवालदार रजनीकांत पुट्ठावार, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, नापोशि विनोद यादव, किशोर वैरागडे, चिकाटे, आनंद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे आदींनी केली.