चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना 75 टक्के जागेसाठी आरक्षण द्या : मनसेची मागणी
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर जवळ कोर्टीमक्ता येथे स्थापन होणार्या इंडियन रिझर्व बटालियनमध्ये जिल्ह्यातील युवकांना 75 टक्के जागा आरक्षित करुन देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सचिन भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीला युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या स्टेट रिझर्व पोलिस फोर्स गट 17 अंतर्गत इंडियन रिझर्व बटालियन-4 तुकडीची स्थापना बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेणार्या तसेच पोलिस भरतीचा सराव करणार्या युवकांमध्ये रोजगार मिळण्याचा व देशसेवा करण्याची संधी मिळेल म्हणून उत्साह आहे. असे असले तरी पोलिस भरतीसाठी सराव करणार्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कारण, तुकडीची स्थापना जरी चंद्रपूर जिल्ह्यात होत असली, तरी त्यामध्ये एकूण जागांपैकी 75 टक्के जागा या गडचिरोली जिल्ह्याकरिता राखीव आहे. उर्वरित 12.5 टक्के जागा चंद्रपूर जिल्ह्याकरिता तसेच 12.5 टक्के जागा गोंदिया जिल्ह्याकरिता राखीव आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात 100 टक्के जागा तेथील युवकांना राखीव असतात. त्यामुळे येथील युवक अर्ज करू शकत नाही आणि पोलिस भरती सराव करणार्या स्थानिक युवकांवर मोठा अन्याय होतो. असे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर, महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, विधी विभाग जिल्हाध्यक्ष मंजू लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता आदी उपस्थित होते.