राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य शासनाचे मानले आभार, शिष्यवृत्तीसाठी पात्र ओबीसी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 

मो:8830857351

चंद्रपूर, 13 ऑक्टोबर: इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेतंर्गत विद्यार्थी संख्येत 10 वरून 50 इतकी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आदींनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या आंदोलनामुळे 12 ऑक्टोबर 2018 ला शासन निर्णय निघून 10 जागा इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या.

महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लोकसंख्याचे प्रमाण लक्षात घेता गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी संख्येत 10 वरून 50 इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या 27 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी संख्येत 10 वरुन 50 इतकी वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. सन 2022-23 पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेतंर्गत विद्यार्थी संख्येत 10 वरून 50 इतकी शाखानिहाय वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र 19, व्यवस्थापन 10, विज्ञान 6, कला 4, विधी अभ्यासक्रम 4, पीएचडी 3, वाणिज्य 2, औषध निर्माण शास्त्र 2 या प्रमाणे शाखानिहाय विभागून देण्यात आले आहे. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी 1 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी विमान तिकिटासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी 30 लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 40 लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय संदर्भाधीन 11 ऑक्टोबर 2018 व 1 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

13 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील जे विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. त्या सर्वांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here