इयत्ता ६ व ८ ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे शासनाचे आदेश, विमाशि. संघाची मोठी उपलब्धी
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
जे शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गाला अध्यापन करित आहे व ज्यांना माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी यापूर्वी लागू करण्यात आली आहे अशा शिक्षकांचे सद्यस्थितीत प्राप्त प्राथमिक शिक्षक वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रामाणपत्र वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश १३ आक्टोबर २०२२ ला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक / माध्यमिक शिक्षणाधिकारी व महानगरपालिका / नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी २० सप्टेंबर २०२२ रोजी यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे लेखी तक्रार केली होती. इयत्ता १ ते ८ ला शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी वर्ग ६ ते ८ ला शिकविणारे काही शिक्षक माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी घेत आहेत. असे शिक्षक आपले वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे जेव्हा दाखल करतात तेव्हा त्यांच्या प्रमाणपत्रावर प्राथमिक शिक्षक प्रमाणपत्र असे असल्यामुळे माध्यमिक शिक्षकाचे प्रशिक्षण केले नाही या सबबीखाली त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी विमाशि. संघाकडे प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे ही लेखी तक्रार संघटनेतर्फे करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने हे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे महामंडळ सदस्य जगदीश जूनघरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष केशवराव ठाकरे व जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे,कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, प्रभाकर पारखी यांनी कळविले आहे. विमाशि. संघाची ही फार मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.