छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या.

सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पंढरपूर:- टवाळखोर तरुणांकडून होणाऱ्य़ा छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे घडली आहे. या विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छेडछाडीमुळे मी आत्महत्या करत असून, तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नसल्याचे तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे वय 17 असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी लहू परमेश्वर गाजरे, स्वप्नील कांतीलाल कौलगे व रमेश निवृत्ती गाजरे सर्व रा. शेळवे, ता. पंढरपूर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

स्वप्नालीने 7 डिसेंबर रोजी राहात्या घरातील अभ्यासाच्या खोलीत आत्महत्या केली होती. बुधवारी 9 डिसेंबर तिचे वडील सत्यवान यांनी तिच्या वह्या तपासल्या असता, त्यातील एका वहीत अर्धे पान चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली. या चिठ्ठीत तिने वरील तिघांकडून होणाऱ्य़ा छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यामुळे सत्यवान गाजरे यांनी या तरुणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

चिठ्ठीत काय लिहले?

“किती सहन करु मी. मला आता अजिबात होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहू टेलर आणि स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नांचा पार धुराळा केलाय. माझी सतत छेड काढून मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.”

स्वप्नालीच्या आत्महत्यानंतर गाजरे कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तिचे नातेवाईकाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here