साहित्यिकांनी समाजाला जागृत करावे : सुधाकर अडबाले
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
गोंडपिपरी, 24 नोव्हेंबर: साहित्यिकांनी समाजाला जागरुक करण्याचे काम करावे व समाजानेही साहित्यिकांना जपावे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. जीवन गौरव साहित्य परिवार व शब्दांकुर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी येथील ज्येष्ठ साहित्यिक उध्दव नारनवरे साहित्य मंच, धनोजे कुणबी समाज सभागृहात विदर्भस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी धनंजय साळवे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. संतोष बांदूरकर, विशेष अतिथी म्हणून नगरसेवक चेतनसिंग गौर, श्रीकृष्ण अर्जुनकर, राजेश ठाकूर, कवी व प्रवचनकार चेतन ठाकरे, रेखा कारेकर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उध्दव नारनवरे यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. साळवे यांनी, फक्त चित्रपट अभिनेता हाच ‘सेलिब्रिटी’ नसावा, तर समाजाला सजग करणारा साहित्यिक हा समाजामध्ये ‘सेलिब्रिटी’ म्हणून गणल्या जावा, असे मत मांडले.
यानिमित्त आयोजित कवि संमेलनात नगरचे कवी रज्जाक शेख यांनी रसिकांचे डोळे पाणावनारी ‘जात्यामंधी बाप तुहा, पिठामंधी माय’ ही रचना सादर केली. यवतमाळचे कवी विजय ढाले यांनी ‘एकदा तरी बळीचे सरकार आले पाहिजे’ ही शेतकर्यांचा एल्गार पुकारणारी रचना सादर करून रसिकांची भरभरून दाद मिळविली. अहमदनगरचे ग्रामीण कवी आनंदा साळवे यांनी सासू सुनेचे नातेसंबंध आपल्या कवितेतून ग्रामीण शैलीत मांडले. कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘जंगलनोंदी’तील आदिवासीच्या व्यथा वेदना रसिकांना अंतर्मुख करून गेल्या. विजय वाटेकर यांच्या उपरोधीक मुक्तछंदाने रसिक काही क्षण अस्वस्थ झालेत. तसेच डॉ. किशोर कवठे, विनायक धानोरकर, विकास गजापुरे, रवींद्र गिमोणकर, राहुल पाटील, डॉ. हितेंद्र धोटे, चेतन ठाकरे, मारोती आरेवार, विरेन खोब्रागडे, राजेंद्र घोटकर, प्रविण तुराणकर, नेताजी सोयाम, दिलीप पाटील यांनीही आपल्या रचनामधून ‘अंगार आणि शृंगार ’ मांडला.
त्यानंतर नोंदणीकृत सहभागी 50 कवींचे कविसंमेलन पार पडले. प्रास्ताविक दुशांत निमकर यांनी केले. संचालन सुचिता जिरकुंटावर यांनी, तर आभार शब्दांकुर फाऊंडेशनचे सचिव राजेश्वर अम्मावार यांनी मानले. निमंत्रित कविच्या संमेलनाचे संचालन फिनिक्स साहित्य मंचचे अध्यक्ष तथा कवी नरेश बोरीकर यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जीवन गौरव साहित्य परिवार व शब्दांकुर फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.