बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल कोसळला, जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

48

बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल कोसळला, जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

 

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

विसापूर / बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या जुन्या पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी अचानक कोसळला. त्यावेळी या पुलावरून काही जण पायी जात असल्याने तेही खाली रूळावर कोसळले. या भीषण अपघातात एकूण 13 जण जखमी झालेत. पैकी तिघे जण गंभीर आहेत. 

या अपघातात एका गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी असलेल्या निलिमा रंगारी (48) रा. बल्लारपूर यांचा मृत्यू झाला आहे. निलिमा ह्या बल्लारपूर येथील रहिवासी आहेत.

साची निलेश पाटील, प्रेम तितरे, निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, चैतन्य मनोज भगत, नयन बाबाराव भीमनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, स्वीटी खरतड, विक्की जयंत भीमलवार, पूजा सोनटक्के, ओम सोनटक्के असे जखमींचे नावे आहेत. तब्बल पाच ते सहा रुग्णवाहिकांतून सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या रेल्वे स्थानकावर 5 प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील 1 आणि 2 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणारा पुलाचा भाग कोसळला. सुदैव म्हणजे, काही वेळापूर्वीच या दरम्यानच्या रूळावर काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी निघून गेली होती. अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती. दोन राज्याच्या सीमा जोडणारे प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून बल्लारशाह ओळखले जाते. दक्षिण भारताकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडया येथूनच ये-जा करतात. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर एकूण 5 रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत. त्यावर साधारणत: प्रवाशी गाड्या थांबतात. तर उर्वरित रेल्वे रूळावर मालगाड्यांचे अवागमन सुरू असते. रेल्वे प्रवाशी या पुलाचा वर्षोन्वर्ष वापर करीत आहेत. गेल्या काही वर्षांत तो जर्जर झाला होता. त्यामुळे त्याची डागडुजी करावी अशी मागणी होत होती.

बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचाही भोंगळ कारभार या अपघातानंतर निदर्शनास आला. जखमींना तातडीने आरपीएफचे जवान तसेच नागरिकांनी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले होते. परंतु, तेथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींची गैरसोय झाली. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला, त्यांनी तातडीने जखमींना चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात यावे, असे सांगितले!