...याला प्रेम कसे म्हणावे? लिव्ह इन रिलेशनशिप विरुद्ध विवाहसंस्था
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
मुंबईत राहणाऱ्या श्रद्धा वाळेकर या तरुण मुलीचा तिचाच प्रियकर असलेल्या आफताब पुनावाला नावाच्या मुलाने दिल्लीत क्रूरपणे हत्या केली. अर्थात त्याचा हा गुन्हा क्रूरपणापेक्षाही मोठा आहे. सैतानालाही लाजवेल अशा क्रूरपणे त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले व मृतदेहाचे ते ३५ तुकडे २० दिवस फ्रिजमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावली. अतिशय थंड डोक्याने केलेल्या या हत्याकांडानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून क्रूरकर्मा आफताबला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे अर्थात त्याला कायद्याने कठोरात कठोर शिक्षा होईलच पण या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची उत्तरे आधी शोधावी लागेल.
श्रद्धा आणि आफताब यांचे प्रेम होते. पण हेच प्रेम श्रद्धाचा जीव घेऊन गेला. आजची तरुण पिढी प्रेमाच्या नावाखाली किती किती आणि कशी भरकटत चालली आहे. प्रेमाच्या नावाखाली स्वतःचा कसा सत्यानाश करून घेत आहे हेच या घटनेतून दिसून आले. वास्तवीक प्रेम ही अतिशय पवित्र गोष्ट आहे पण आफताब सारख्या प्रेमरोग्यांमुळे प्रेमासारखा पवित्र शब्दही बदनाम होत आहे. श्रद्धाच्या पालकांनीही श्रद्धाला आफताबशी प्रेम संबंध ठेवण्यास विरोध केला होता मात्र आफताबच्या प्रेमात वेड्या झालेल्या श्रद्धाने आपल्या पालकांचेही ऐकले नाही. आपले आई वडील हे आपल्या चांगल्याचाच विचार करतात हे आजच्या पिढीला मान्य नाही. आम्ही सज्ञान झालो म्हणजे आम्ही आमचा निर्णय घेण्यास सक्षम आहोत अशा आविर्भावात वावरणारी आजची पिढी पालकांच्या मताला किंमत देत नाही त्यामुळेच असा अनर्थ घडतो. जर श्रद्धाने तिच्या आई वडिलांचे ऐकले असते तर आज ती या जगात असती पण आई वडिलांचे न ऐकता आफताबसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला.
लिव्ह इन रिलेशनशिप सध्या फॅशन बनली आहे. लग्नाशिवाय एकत्र राहायचे पटलं तर ठीक नाही तर वेगळे व्हायचे असा हा सारा मामला. बरे आता लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्यानेही मान्यता दिली आहे त्यामुळे कोणी त्यावर आवाजही उठवू शकत नाही. काही जण तर लिव्ह इन रिलेशनशिपकडे विवाह संस्थेला पर्याय म्हणूनही पाहत आहेत पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विवाह संस्थेला कायदेशीर आणि सामाजिक बंधन असतात. जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव असते. प्रेम, त्याग आणि तडजोडीबरोबरच विवाहात समर्पणभावही असतो या उलट लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कसलेही बंधन नसते, जबाबदारी नसते असते ती उन्मक्त आणि बंधनमुक जीवन. हेच बंधनमुक आणि उन्मक्त जीवन तरुण पिढीच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे.
आजची तरुण मुले मुली त्यातही उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातील मुले मुली कायदेशीर बंधनामुळे विवाहापासून दूर जाऊ लागली आहेत. जबाबदारी न स्वीकारता बंधनमुक जीवन जगता येते म्हणून ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय स्वीकारु लागली आहेत. याला काही जण सामाजिक सुधारणा म्हणतील पण माझ्या मते ही सामाजिक सुधारणा नसून विवाह संस्थेवर घातलेला घाला आहे. प्रेम कोणतेही असो मग ते पती पत्नी मधील असो की लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याचे प्रेमाला मर्यादा असतातच. एका ठराविक काळानंतर प्रेम कमी होऊ लागते लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याला त्यामुळेच सुरक्षिततेचा अभाव वाटतो कारण प्रेमाशिवाय त्यांना काहीच माहिती नसते या उलट विवाहात प्रेमासोबतच त्याग, समर्पण आणि जबाबदारीची जाणीव असते त्यामुळे छोट्या मोठ्या कुरबुरीचे मोठ्या वादात रूपांतर होत नाही आणि झाले तरी कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने तो वाद निकालात काढला जातो.
लिव्ह इन मध्ये दोघेच असल्याने कोण बरोबर कोण चूक हे तिसऱ्या माणसाने सांगण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळेच छोट्या मोठ्या कुरबुरीचे मोठ्या वादात रूपांतर झाले , वाद वेळीच मिटला नाही तर ते बेफाम होतात. मनात सैतानी विचार निर्माण होतात त्यातूनच मग असा क्रूर प्रकार करण्यासही तरुण मागेपुढे पाहत नाही. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीने बंधनमुक, जबाबदारी विरहित, उन्मक्त जीवन ( लिव्ह इन रिलेशनशिप ) हवे की त्याग, समर्पण आणि जबाबदारीची जाणीव असलेले ( वैवाहिक ) जीवन हवे हे ठरवावे.
मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
मीडियावार्तच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आणि रोजगार अपडेट्स व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी क्लिक करा ⬇️