उत्तर कोरियाचा आततायीपणा

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन हा आपल्या विक्षिप्तपणाबद्दल जगात प्रसिद्ध आहे. त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. हुकूमशहा किम जोंग ऊन हा जितका विक्षिप्त आहे तितकाच तो आक्रमक राष्ट्रप्रमुख आहे. मागील काही वर्षात त्याने अनेक क्षेपणास्त्र चाचण्या करुन अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या आपल्या शत्रू राष्ट्रांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्याने काही प्रमाणात संयमाची भूमिका स्वीकारली होती कारण दोघांचीही जातकुळी एकच होती मात्र आता ज्यो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून हुकूमशहा किम जोंग ऊन पुन्हा आक्रमक झाला आहे.

अमेरिकेसोबत दक्षिण कोरियाने लष्करी सराव सुरू केल्याने हुकूमशहा किम जोंग ऊन याचा तिळपापड झाला म्हणूनच त्याने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला इशारा देण्यासाठी एकाच वेळी तब्बल २३ क्षेपणास्त्रे डागली. त्याच्या या आक्रमक भूमकेमुळे जगभर खळबळ उडाली. उत्तर कोरियाने डागलेल्या या २३ क्षेपणास्त्रांपैकी काही क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेजवळ पडली तर काही क्षेपणास्त्रे जपानच्या सीमेजवळ पडली. उत्तर कोरियाच्या या आक्रमक भूमीकेमुळे दक्षिण कोरिया आणि जपान या देशाची चिंता वाढली आहे. उत्तर कोरियाने डागलेल्या या क्षेपणास्त्रांची परतफेड म्हणून दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या दिशेने तीन क्षेपणास्त्रे डागली. सुदैवाने ती उत्तर कोरियात पडली नाही. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी तातडीने या हल्ल्याच्या निषेध करत थेट प्रतिउत्तर देण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला जपानी जनतेचे रक्षण करायचे आहे. जर उत्तर कोरियाने या हल्ल्याची पुनरावृत्ती केली तर जपान उत्तर कोरियास जशास तसे उत्तर देईल असा इशाराही जपानने उत्तर कोरियाला दिला त्यामुळे एका बाजूला उत्तर कोरिया तर दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरिया आणि जपान अशी स्थिती निर्माण झाली आहे मात्र त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे .

कारण किम जोंग ऊन हा विक्षिप्त आहे. त्याच्याकडे अण्वस्त्रांचा साठा आहे जर हा वाद निवळला नाही आणि उद्या युद्धाला तोंड फुटले तर हा विक्षिप्त हुकूमशहा अण्वस्त्रांचा वापर करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. उत्तर कोरिया हे पूर्वीपासून आक्रमक राष्ट्र म्हणून ओळखले जाते. १९७० च्या दशकात उत्तर कोरियाने रशियाला आण्विक सामर्थ्य निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली मात्र रशियाने ती नाकारली. मात्र दक्षिण कोरिया अमेरिकेच्या जवळ गेल्याने रशियाने उत्तर कोरियाला मदत करण्याचे ठरवले आणि १९७८ ते १९९१ या काळात हळूहळू उत्तर कोरियाला आण्विक सामर्थ्य वाढवण्यास मदत केली या काळात चीननेही उत्तर कोरियाच्या आण्विक महत्वाकांक्षेला खतपाणी घातले त्यामुळे उत्तर कोरिया हे आज अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनले. उत्तर कोरिया अण्वस्त्र राष्ट्र बनल्याने जपान आणि उत्तर कोरियाची डोकेदुखी मात्र वाढली.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्ष नवा नाही. आजवर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर सात वेळा हल्ले केले मात्र अमेरिका दक्षिण कोरियाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या संघर्षात जपान सारखा शांतताप्रिय देश मात्र विनाकारण खेचला जात आहे. जपान हा दक्षिण कोरियाचा मित्र देश असल्याने उत्तर कोरिया जपानला देखील आपला शत्रू मानत आहे त्यामुळे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया प्रमाणे जपानवर देखील क्षेपणास्त्रे डागत आहे. ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली तर स्वतःचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी जपान देखील दोन्ही कोरियाच्या संघर्षात उडी घेईल तेंव्हा मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल त्यामुळेच हा संघर्ष आणखी वाढू नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघासह जगातील सर्वच देशांनी पुढाकार घ्यावा.

युद्ध कोणत्याही देशाला परवडत नाही युद्धात होत्याचे नव्हते होते. युद्धाची सर्वाधिक झळ सर्वसामान्य जनतेला बसते मात्र किम जोंग ऊन सारख्या विक्षिप्त हुकूमशाला त्याचे काही देणे घेणे त्यामुळेच तो असा आततायीपणा करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here