अलीकडे महिलाराज की महिला होत आहेत कमकुवत? 

55

अलीकडे महिलाराज की महिला होत आहेत कमकुवत? 

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

आपण पाहतो की आज पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही कामे करु लागल्या आहेत. जी अवघड कामं आधी पुरुषच मंडळी करीत होती. तिही कामं आज महिला करतांना दिसत आहेत. आज महिलांनी अंतरिक्षच क्षेत्र नाही तर सैन्यदलातही महिला सहभागी होवू लागल्या आहेत. तसेच देशाचे संरक्षण करण्यासाठी हातभार लावू लागल्या आहेत. आज महिला राज्यपालच नाही तर राष्ट्रपतीही झाल्या आहेत. तसेच पंतप्रधानही. त्यामुळं आज महिलांना महिला कमकुवत आहे असं म्हणता येत नाही. महिलाही आज पुरुषांच्या बरोबरीनंं खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करीत आहेत.

           महिलांच्या बाबतीत आज सांगतांना आज महिला कमकुवत नाही असं सांगणं भाग पडतं. याचा अर्थ पुर्वी महिला कमकुवत होत्या काय? तर याचे उत्तर नाही असंच येईल. कारण पुर्वी महिला पुरुषांच्या बरोहरीनं बसून शास्रार्थ करीत होत्या. गार्गी, मैत्रेयी याची उदाहरणं. पुर्वीही महिला निर्णय घेवू शकत होत्या. माता सीता याचं उत्कृष्ट उदाहरण. तसेच पुर्वीही महिलांचा राज होता. यामध्ये एकलव्याच्या आईचं उदाहरण व रामाची बहिण शांताचं उदाहरण. पती मृत्यू पावल्यानंतर एकलव्याच्या आईनं काही दिवस राजपाट सांभाळला तसेच शांतेचा विवाह एका मुनीशी होताच त्या मुनीनं राज्यकारभार केला नाही. आपले दत्तक वडील राजा रोमपदानंतर तिनं अंग देशाचा राज्यकारभार सांभाळला. त्यामुळं महिला त्यावेळीही कमकुवत नव्हती. ती सक्षम होती. याचाच अर्थ असा की महिला पुर्वीही कमकुवत नव्हत्या तर त्या सक्षम होत्या. त्या युद्धवेळी युद्धमैदानावरही जात होत्या. कुशलतेनं युद्धही करीत होत्या आणि युद्धाचं नेतृत्वही. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

           वरील सर्व उदाहरणावरुन महिला पुर्वी सक्षम होती, आजही आहे तर मग आज महिलांना कमकुवत का समजलं जातं? कालही महिला कमकुवत होती असं का म्हटलं जातं? आज महिला खरंच कमकुवत आहे काय? तर याचं उत्तरही आहे असंच म्हणता येईल. तसेच कालही महिला कमकुवत होती असं म्हणता येईल. त्याचीही उदाहरणं देतो.

           महाभारताच्या काही भागाचा अभ्यास केल्यास महाराणी द्रोपदीला किती अत्याचार सहन करावा लागला हे न सांगीतलेलं बरं. तिची परवानगी न घेता तिला द्युतक्रिडेत डावावर लावणे, ती द्युतक्रिडा हारताच तिचे केसं पकडून तिला भर दरबारात केसं पकडून आणणे, तिचा अपमान होत असतांना बघ्यांची भुमिका घेणारा पुरुषवर्ग निमुटपणे पाहणे. एवढंच नाही तर माधवीचं सती जाणं ह्या गोष्टी त्याही काळात महिला कमकुवत होती हे दर्शवतात. तर महाराज शांतनुची दुसरी पत्नी महाराणी सत्यवतीनं भिष्माकडून विवाहप्रसंगी वचन घेतलं होतं की जर तो आजीवन अविवाहीत राहात असेल तरच ती त्याचे वडील शांतनुशी विवाह करेल. त्यावेळी भिष्मानं महाराणी सत्यवतीला वचन दिलं होतं की तो कधीच आयुष्यात विवाह करणार नाही. त्यानुसार त्यानं कधीच विवाह केला नाही. याठिकाणी महिला सक्षम दिसून येते. ती कमकुवत नव्हती हेच दिसून येते. महिला त्याही काळात सक्षम होती आणि त्याही काळात कमकुवत होती. फरक एवढाच होता की लोकांचे विचार. लोकांच्या विचारसरणीनुसार काही ठिकाणी महिला सक्षम होती तर काही ठिकाणी महिला कमकुवत असल्याचे दिसून येते. ही गोष्ट काही काही परिवारात प्रकर्षानं जाणवते. 

          मध्यंतरीच्या काळात स्रियांना कमकुवत करण्याचे नव्हे तर बनविण्याचे प्रयत्न झाले. स्रिया कधीच पुढे जावू नये. त्यांनी युद्धमैदानावर लढू नये. म्हणून सारेच प्रयत्न केले गेले. जसे गणपरिषदेची नायिका असलेली आम्रपाली हिला जाणुनबुजून नगरवधू बनविण्यात आलं. तसेच स्रियांच्या जीवनात सतीप्रथा आल्या. विधवा विवाहावर बंधन घालण्यात आलं. बालविवाहाला मान्यता दिली गेली. महत्वाचं सांगायचं म्हणजे सारेच बंधन घालण्यात आले स्रियांना कमजोर करण्यासाठी. त्यातच देवदासीप्रथेचंही बंधन घालण्यात आलं.

          स्रियांचं शोषण कालपरत्वे होत गेलं. स्वयंवरातून मनपसंतीचा पती निवडण्याचे स्वातंत्र्य बाधीत झाले. तिला आपल्या पसंतीचा पती निवडण्यावर बंधन घालण्यात आलं. यात काही गोष्टी ब-या होत्या तर काही गोष्टी ह्या स्रियांसाठी जीवघेण्या स्वरुपाच्या होत्या. 

           सतीप्रथा……..स्रियांची इच्छा नसतांनाही तिला जाणूनबुजून अग्नीच्या स्वाधीन करण्यात आलं. ह्याठिकाणी सतीप्रथा वाईट ठरली. परंतू युद्धात आपले पती मरण पावताच परकीय राज्यांनी आपली अब्रू लुटू नये म्हणून खुद्द राण्यांनी स्वतः जोहार केला. ह्या ठिकाणी सतीप्रथा सरस ठरली. 

          महिला कालही कमकुवत नव्हती. अन् आजही कमकुवत नाही. परंतू आज महिलांना कमकुवत समजलं जातं. ती अंतराळात गेली तरी. ती राष्ट्रपती बनली तरी आणि आता ती सैन्यात जात आहे तरी. खरंच आज महिला कमकुवत वाटते काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आज महिला कमकुवत नाही. ती पुरुषांच्या बरोबरीनं बांधकाम व्यवसायात, मोटार बनविण्याच्या कारखान्यात, ऊस तोडणी करण्याच्या कार्यात, शेतीव्यवसाय इत्यादी व्यवसायात काम करीत असते. यावरुन ती सक्षम दिसते. परंतू ती दिवसभर बाहेर काम करते आणि सायंकाळी घरी येवूनही घरी काम करते. स्वयंपाक बनवते आणि आपल्या बाळांना भरवते. परंतू तिचा पती दिवसभर गावात रिकामचोट फिरतो. अन् रात्री आयता येवून आयतंं बनलेलं अन्नाचं ताट खातो. ती दिवसभर मेहनत करते आणि रात्रीही मेहनत आणि तो दिवसभर रिकामा अन् रात्रीही. फक्त अन्न प्राशन करतो आयत्या बिळात नागोबा बनून. तरीही असा स्वयंपाक झाला, तसा स्वयंपाक झाला असे टोमणे असतात त्याचे आणि ती मात्र निगरगट्ट ऐकते चूप बसून. तेव्हा मात्र महिला कमकुवत दिसते ती सक्षम असली तरी आणि तिच्यावर काहीसक्षम असलेल्या महिला कविता बनवीत असतात. चार गोष्टी भाषणातून बोलत असतात. दोनचार लेखही लिहीत असतात. परंतू तो केवळ दिखावा असतो. निव्वळ पोकळ बोलणं. करणं काहीच नसतं बालीश बहू बायकात बडबडल्यासारखं. 

          आजही महिला सक्षम नाही. कारण तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाही. काही ठिकाणी तिची इच्छा नसतांनाही मुलं पैदा करण्यासाठी अत्याचार केला जातो. तर काही ठिकाणी आजही तिला कमजोर समजत बलात्कार. आजही काही ठिकाणी महिलांना द्युतात लावलं जातं आणि आजही काही ठिकाणी सर्रासपणे बालविवाह लावले जातात. जरी काही महिला राष्ट्रपकी, पंतप्रधान बनल्या तरी आणि काही ठिकाणी महिला अंतराळात गेल्या असल्या तरी.

           आज काही ठिकाणच्या महिला सक्षम आहेत. परंतू ज्या सक्षम आहेत. त्या कधीकधी अतिरेक करतांना दिसतात. त्या महिला आपल्याच स्रीजातीवर पुरुषांकडून अत्याचार करतात. त्यांना कमकुवत दाखवतात स्वतः शिरजोर व सक्षम दाखविण्यासाठी. खरंच महिला सक्षम कशा होतील! आज असेच आकडे वाढत आहेत. घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत महीला सक्षमीकरणावरुन. खरंच आजचं हे वास्तवीक चित्र पाहता काही ठिकाणी महिला सक्षम आहे तर काही ठिकाणी महिला खरंच एवढी कमकुवत आहे की तिला वर डोकं काढायची हिंमत होत नाही. 

           महत्वाचं सांगायचं म्हणजे आज महिलांना कमजोर म्हणावं की म्हणू नये हा प्रश्न आहे. तो केवळ प्रश्नच नाही तर संभ्रम आहे भरपूर लोकांच्या मनात. त्यामुळं अलीकडं महिलाराज की महिला कमकुवत असं समजणं कठीण झालंय. काही काही कुटूंबात स्रिया पुरुषांवर एवढ्या अत्याचार करतात की ते शब्दात मांडणे कठीण. सांगता येणंही कठीण. कारण त्या गोष्टी सांगतांना समाज हासतो महिला सक्षमीकरणावरुन. कोणी दुषणे देतात. म्हणतात की हातात बांगड्या घातल्या आहेत की राव आपण. तेव्हा अतिशय लाज वाटते. आपली अब्रू गेल्यासारखी वाटते. खरं कारण सांगताही येत नाही. ही देखील वास्तविकताच आहे महिला सक्षमीकरणाची. 

           विशेष सांगायचं म्हणजे स्वातंत्र्य असावं, परंतू स्वैराचार नसावा असं आपण म्हणतो. तेच महिला सक्षमीकरणाच्या बाबतीतही दिसून येतं. पुर्वीपासूनच अशी सक्षमीकरणाची विषम दरी दिसते. एकीकडं महिलाराज तर दुसरीकडं महिला कमकुवत. एकीकडं पुरुषराज तर दुसरीकडं पुरुष कमकुवत. यावरुन खरा कमकुवत कोण हे ओळखता येणं कठीण आहे. विशेष म्हणजे आजची पुरुष आणि महिलांची स्थिती पाहता आज महिलाही कमकुवत नाही आणि पुरुषही नाही. त्यामुळं कोणीही कोणाला कमजोर समजू नये. कोणीही कोणाला कमकुवत ठरवू नये. तसेच कोणीही कोणाला कमकुवत समजून कोणीही कोणावर अत्याचार करु नये. एकमेकांना समजून घ्यावे. तेव्हाच ख-या अर्थानं महिला सक्षम होईल. पुरुषही सक्षम होईल आणि हे ज्या दिवशी घडेल, त्याच दिवशी तो देशही सक्षम व्हायला वेळ लागणार नाही. हे तेवढंच खरं आहे.