आंभोरा – एक प्रेक्षणीय स्थळ

52

आंभोरा – एक प्रेक्षणीय स्थळ

अंकुश शिंगाडे नागपूर 

मो: ९३७३३५९४५०

आंभो-याला हरिनाथ महाराज पुण्यतिथी निमित्याने कविसंमेलनाला जाणे झाले. त्यावेळी विदर्भ साहित्य संघ केंद्रीय शाखा नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. तसेच ज्यांनी मनोहर अंबानगरी पुस्तक लिहिले. ते म रा जोशीही उपस्थीत होते. त्यावेळी आंभोरा या ठिकाणाचा घेतलेला आढावा. आंभोरा…….आंभोरा एक प्रेक्षणीय स्थळ आहे विदर्भातील. या स्थळी पाच नद्यांचं संगम झालेला आहे. कोलार, मुर्झा, वैनगंगा, कन्हान व आम. म्हणतात की या पाच नद्यांच्या संगमानं हा परीसर अतिशय पावन झालेला आहे.

आंभोरा विदर्भातील एक प्रेक्षणीय स्थळ. या स्थळी पाच नद्यांचा संगम असून या ठिकाणी खरा स्वर्ग प्राप्त झाल्याचा आनंद वाटतो. याचं कारण आहे त्या ठिकाणच्या चैतन्येश्वराचं अस्तित्व. 

चैतन्येश्वर……काय आहे हे चैतन्येश्वर? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. कारण या चैतन्येश्वराची कृपा म्हटलं आहे मी.

चैतन्येश्वर हे एक मंदीर आहे शिव भगवानाचे. य ठिकाणी काही लोकं अंदाज करतात की प्राचीन काळी एका भक्तानं काहीतरी मागणे इथे असलेल्या टेकडीवर तपश्चर्या करुन मागीतले होते. त्या भक्तानं या ठिकाणी तपश्चर्या करताच त्याचे तपश्चर्येवर खुश होवून शिव भगवान हे भक्तांच्या इच्छेसाठी प्रगटले व त्यांनी तथास्तू म्हणत एक वरदान दिलं. त्यानुसार इथे एक संप्रदाय निर्माण झाला. तोच नाथ संप्रदाय होय. म्हणतात की निवृत्तीनाथ जे संत ज्ञानेश्वराचे गुरु आहेत. ते शेवटले आहेत या रांगेतील. कारण त्यानंतर निवृत्तीनाथानं संत ज्ञानेश्वराला दिक्षा दिली व संत ज्ञानेश्वरांनी पुढं वारकरी संप्रदाय सुरु केला. तिथं नाथ परंपरा संपली.

रघुनाथ व हरिनाथ हे त्याच नाथ परंपरेतील होते. रघुनाथ हा हरिनाथाचा मुलगा म्हटलं गेलेलं असून या ठिकाणी या मुलाचे व बापाचे शिष्यत्व पत्करलेला मुकूंदराज याचीही परंपरा या ठिकाणाला लाभलेली आहे. मुकूंदराजांनी मराठीचा विवेकसिंधू नावाचा आद्यग्रंथ याच ठिकाणी लिहिला. 

 या ठिकाणी कोलार, नाग, मुर्झा, आम व वैनगंगेचा संगम असून या नद्यांनी हा प्रदेश स्वर्गासारखा पवित्र करुन टाकलेला आहे. त्यातच चैतन्येश्वराची कृपाही या परसरावर आहे. 

सुजलाम सुफलाम असा आमचा भारत देश. या देशात बारा ज्योतीर्लिंग आहेत. ज्योतीर्लिंग म्हणजे स्वतः भक्तांना दर्शन देण्यासाठी जिथे भगवान शिव प्रगटले. ते ठिकाण.यात उजैनचा महाकालेश्वर, दक्षीण भागातील तामीळनाडूचा रामेश्वर, नाशीकचा त्रंबकेश्वर, गुजरातचा सोमनाथ,महाराष्ट्रातील घुष्णेश्वर, आंध्रचा मल्लिकार्जून, मध्यप्रदेशचा ओंकारेश्वर, उत्तराखंडचा केेदारनाथ, महाराष्ट्रचा भीमाशंकर, उत्तरप्रदेशचा ज्योतीर्लिंग, झारखंडचा बैजनाथ, गुजरातचा नागेश्वर यांचा समावेश होतो. या रांगेत देेशातील संपुर्ण स्वयंभू प्रगटलेल्या ज्योतीर्लिंगाचा समावेश आहे. तसं पुरातन इतिहासातही लिहिलेले दिसते. परंतू या ज्योतिर्लिंगावरुन असा प्रश्न पडतो आणि वाटते की ह्या ज्योतर्लिंगाचा त्यात समावेश का नसावा.

आंभोरा येथील ज्योतीर्लिंग हे देखील एक स्वयंभू ज्योतीर्लिंग असून तेही ज्योतीर्लिंग स्वतः प्रगटले असे येथील काही भक्त मंडळी म्हणतात तर काही भक्त मंडळी त्याचा चमत्कारही सांगतात. अनेक लोकंं दरवर्षी शेकडो किमी अंतरावरुन इथे येत असून इथं भक्तांची मंदियाळी लागते. याठिकाणी एक शिवलिंग असून कोणी म्हणतात की आम्ही लहान होतो, तेव्हा हे शिवलिंग मोठं होतंं. परंतू आता हे लहान झालं आहे. त्याचं कारण म्हणजे या पिंडीवर होणारा अभिषेक. या ठिकाणी येवून अनेक लोक या ठिकाणी असलेल्या चैतन्येश्वराचा अभिषेक करतात. माहिती मिळाली की राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देखील या ठिकाणी एकदा येवून गेले. तसेच विद्यमान केंद्रीय मंत्री पदावर असलेले नितीन गडकरीही इथे येवून गेलेलेे असून त्यांनी हा परीसर पाहीला. ते हा परीसर पाहून भारावले असतील कदाचीत. कारण त्यांनी या उपेक्षीत पडलेल्या भागाची दखल घेवून या भागाला मुर्त स्वरुप दिलेलं आहे. या भागासाठी व या भागाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी केंद्र आणि राज्यातून पाचशे कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत. त्याचं काम झपाट्यानं दिवस रात्र सुरु असून गडकरी साहेबांनी म्हटलं आहे की येत्या चौदा जानेवारीला माझी गाडी या पुलावरुन आंभो-यावरुन पलीकडे जायला हवी. त्यादृष्टीने पावलं पडत आहेत. 

असे म्हणतात की पुर्वी आंभोरा हे छोटंसं गाव होतं. या गावातून वाहणारी वैनगंगा नदी ही एक लहानशी नदी होती. तिच्या उपनद्या होत्या नाग, कन्हान, आम आणि कोलार. परंतू वैनगंगेचा प्रवाह पाहिजे तेवढा मोठा नव्हता. म्हणतात की दरवर्षी महाशिवरात्रीला इथे चैतन्येश्वराची मोठी यात्रा भरत असे. परंतू कालांतरानं दरवर्षी येणा-या पावसानं व दरवर्षी नद्यांना येणा-या प्रवाहानं या नदीचं पात्र मोठं झालं. पुढं याच नदीवर गोसेखुर्द प्रकल्प बनला आणि या नदीचं रुपच बदललं.

 या चैतन्येश्वराच्या चमत्काराबाबत सांगतो. त्याला पाहिजे तर चमत्कारही म्हणता येणार नाही आणि मानलं तर चमत्कारही म्हणावं लागेल. ज्यावेळी १९९४ ला पूर आला, त्यावेळी पुर्ण परीसर बुडाला होता पाण्यात. परंतू या मंदीराचा वरचा भाग बुडाला नव्हता. त्याचे हेलिकॉप्टरनं घेतलेले छायाचित्र आजही मंदिरात अस्तित्वात आहेत.

 या मंदिराच्या बाजूलाच कालासूर नावाच्या राजाचं मंदीर आहे. मंदीर छोटंसं असून हे मंदीर वाकाटक कालीन असेल याची जाणीव हे मंदीर पाहताक्षणीच होते. मंदीर छोटंसं जरी असलं तर छान आहे. तेया भागातील सर्वात उंच टेकडीवर असून म्हणतात की या ठिकाणाहून या ठिकाणी वैनगंगेला मिळणा-या सर्व नद्यांचे प्रवाह दिसतात. आम्ही जेव्हा तिथं गेलो, तेव्हा आम्हाला तिथं ते पाच प्रवाह दिसले नाहीत. कारण गोसेखुर्दचे पाणा याही भागात भरलेले असून जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी होते. धुके पसरलेले होते आणि त्या धुक्यामुळं आजुबाजुचं स्पष्ट दिसत नव्हतं. विशेष सांगायचं म्हणजे या कोलासूर टेकडीवरुन हा भाग पाहिला असता या ठिकाणी कोणी स्वर्गातील अप्सरा फेर धरुन नाचतांना अवश्य दिसते. एवढा हा परीसर आज गोसेखुर्द प्रकल्पानं रम्य झाला.

गोसेखुर्द प्रकल्प…….आंभो-यावरुन पुढे काही किमी अंतरावर हा परीसर असून यामुळं या भागात नदीच्या दोन्ही भागाला पाणी पसरते. त्यामुळं शेतक-यांचं बरंच नुकसानही झालं आहे. अनेकांच्या शेत्या गेल्या आहेत या नदीच्या पाण्यात. त्याचा पैसा लोकांना मिळाला. परंतू तो पैसा येथील शेतक-यांनी उध्वस्त केला. कोणी अचानक पैसा मिळाल्यानं दारुच्या आहारी गेले व पैसा उडवला तर कोणी गाड्या खरेदी करुन त्यात पैसा उडवला. कोणी मोठमोठे घरं बांधले व ते रोजमजुरी करायला लागले. पर्यायानं सांगायचं झाल्यास काल जे मालक होते, ते या गोसेखुर्द प्रकल्पानं वेठबिगार बनले असे म्हणायला काहीच हरकत नाही. आजही कित्येक लोकं याच परीसरात उपासमार भोगत आहेत असे म्हणायला काहीही हरकत नाही. 

 अलीकडं आंभो-याचं सौंदर्यीकरण सुरु झालं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण होत आहे. कोणी म्हणतात की या भागात बुद्धनगरीही निप्नाण होत आहे एका भागात तर दुस-या भागात महाभारताचे दृश्य दिसतील. ते दृश्य लाईटाच्या रंगीबेरंगी प्रकाशात चमकतील, खालून नदीच्या पाण्यातून तृषार निघती व ते तृषारही रंगीत वाटतील. रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रचंड देखावा निर्माण होईल. एकंदरीत सांगायचं झाल्यास हे ठिकाण पर्यटकाच्या फिरण्याचे अर्थात पर्यटनाचे केंद्र बनेल. त्यातच म्हटलं जातं आणि मानलं जातं की या ठिकाणी बेघर झालेल्या लोकांना या आंभो-याच्या सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून रोजगारही मिळेल. परंतू महत्वाचं सांगायचं झाल्यास ती पिढी कोणती असेल आणि तो दिवस कोणता असेल की ज्या काळात हे संपन्न होईल व येणा-या पिढीला पोट भरता येईल. 

हरिनाथ……..त्याचा शिष्य होता मुकूंदराज. मुकूंदराज काशीखेडला राहात होता. हे काशीखेड अमरावती जिल्ह्यात आहे. तिथं मुकूंदराजची समाधी आहे. तो येथील महती पाहून या ठिकाणी आला. इथं येवून त्यानं मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला. त्याचं विवेकसिंधू नाव ठेवलं. त्यावेळी वाचक परिवार कमी असल्यानं त्यानं तो ग्रंथ ताम्रपत्रावर लिहिला. त्यानंतर काही काळ गेला. काही काळानंतर ते ताम्रपत्र लोकांना सापडलं. ते सापडताच लोकांना समजलं की अकराव्या शतकात एक मुकूंदराज नावाचा कवी होवून गेला. ज्यानं मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला. 

 काल मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून प्रयत्न करणारे मुकूंदराज. आज मराठी भाषा अतिशय मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मराठीला आजही अभिजात दर्जा नाही. परंतू आपण हे लक्षात घ्यायला हवे की कालच्या आपल्या नेत्यांनी मराठीला समृद्ध करण्यासाठी जे प्रयत्न केले. तेच प्रयत्न आजही करायला हवे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मराठी समृद्ध व्हावी व तिलाही अभिजात दर्जा मिळावा. जेव्हा असं घडेल, तेव्हाच मुकूंदराजांना ख-या रुपानं शांती मिळेल हे सांगायला नको.